
लातूर, 08 मार्च (हिं.स.)।
गुटखा आणि दारू साठा नष्ट
अहमदपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या पाच वर्षांत विविध धाडींमध्ये जप्त करण्यात आलेला सुमारे २६ लाख ५७ हजार ६१३ रुपयांचा अवैध गुटखा आणि दारू साठा पोलिसांकडून नष्ट करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अरविंद रायबोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांनी ही मोठी मोहीम राबविली.
याबाबत पोलीसांकडून मिळालेली सविस्तर माहिती अशी की, सन २०२१ ते २०२५ या कालावधीत अहमदपूर पोलिसांनी दारूबंदी कायद्यांतर्गत ११० गुन्ह्यांमध्ये ४ लाख ५८ हजार ७१० रुपयांची दारू जप्त केली होती, तर गुटखाबंदीच्या २२ गुन्ह्यांमध्ये २१ लाख ९८ हजार ९०३ रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला होता.
हा सर्व साठा नष्ट करण्यासाठी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व जिल्हा सत्र न्यायालय अहमदपूर यांची रितसर परवानगी प्राप्त करण्यात आली होती. त्यानंतर जिल्हा दारूबंदी अधिकारी यांचे प्रतिनिधी दुय्यम निरीक्षक माकोडे आणि अन्न व औषध प्रशासन विभागाचे प्रमुख लोंढे यांच्या उपस्थितीत संयुक्त कारवाई करण्यात आली. दिनांक २ आणि ६ मार्च २०२६ रोजी अहमदपूर नगरपरिषदेच्या डंपिंग ग्राऊंडवर हा सर्व मुद्देमाल खड्डा खोदून, बाटल्या फोडून आणि गुटखा जाळून नष्ट करण्यात आला.
या महत्त्वपूर्ण कारवाईत पोलीस उपनिरीक्षक रवी बुरकुले, महिला पोलीस उपनिरीक्षक स्मिता जाधव, पोलीस हवालदार मनोहर राठोड, बाळू आरदवाड, गंगाधर चपडे, पोलीस कॉन्स्टेबल गणेश चव्हाण, दिलीप साबळे आणि होमगार्डच्या पथकाने सक्रिय सहभाग नोंदवला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis