पोलिसांकडून दुचाकी चोरी करून स्क्रॅप करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
लातूर, 08 मार्च (हिं.स.)। शहरातील गर्दीच्या ठिकाणांहून मोटारसायकली चोरी करून त्या स्क्रॅपमध्ये रूपांतरित करणाऱ्या टोळीचा गांधी चौक पोलिसांनी पर्दाफाश केला असून या प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत चोरी केलेल्या मोटारसायकलींचे स
पोलीस कारवाई


लातूर, 08 मार्च (हिं.स.)।

शहरातील गर्दीच्या ठिकाणांहून मोटारसायकली चोरी करून त्या स्क्रॅपमध्ये रूपांतरित करणाऱ्या टोळीचा गांधी चौक पोलिसांनी पर्दाफाश केला असून या प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत चोरी केलेल्या मोटारसायकलींचे सुटे भाग तसेच एक मोटारसायकल असा एकूण सुमारे १ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून ७ गुन्ह्यांचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे.

पोलीस ठाणे गांधी चौक हद्दीत मागील काही दिवसांत गुळ मार्केट, भाजी मार्केट तसेच बसस्थानक परिसरातील वर्दळीच्या ठिकाणांहून मोटारसायकल चोरीच्या घटना घडल्या होत्या. या प्रकरणी गांधी चौक पोलीस ठाण्यात विविध गुन्हे दाखल करण्यात आले होते. सदर गुन्ह्यांचा तपास सुरू असताना पोलीस निरीक्षक श्री. सुनिल रेजितवाड यांनी पोलीस अधिकारी, अंमलदार तसेच गुन्हे प्रकटीकरण शाखेला सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून व गोपनीय बातमीदारांच्या माध्यमातून आरोपींचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार विशेष पथके तयार करून तपासाची दिशा निश्चित करण्यात आली.

तपासादरम्यान पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे दि. ०६ मार्च २०२६ रोजी सापळा रचून आरोपी रफिक रहीमसाब शेख (वय ५१ वर्षे, रा. नायगाव उमरगा ता. चाकूर जि. लातूर, सध्या राहणार एकमिनार मस्जिदजवळ, आजमनगर लातूर) यास मोटारसायकल चोरी करताना रंगेहात पकडले. त्याच्या ताब्यातून हिरो होंडा कंपनीची HF Deluxe (एमएच-२४ एडी-४२२६) अंदाजे किंमत २५ हजार रुपये ही मोटारसायकल जप्त करण्यात आली. आरोपीकडे सखोल चौकशी केली असता त्याने गांधी चौक पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या अनेक मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिली. तसेच चोरी केलेल्या मोटारसायकली आपल्या साथीदारांकडे देऊन त्या स्क्रॅपमध्ये रूपांतरित करून सुटे भाग विक्रीस काढत असल्याची माहिती समोर आली.

त्यानुसार पोलिसांनी आरोपीचे साथीदार

१) नजीर शमीम शेख (वय ३८, रा. लालनगर अंबाजोगाई, सध्या सपकाळनगर मळवटी रोड लातूर)

२) तालीफ महमद शेख (वय ३२, रा. लालनगर अंबाजोगाई, सध्या अब्दुल कलाम नगर, लातूर)

३) युसुफ इस्माईल शेख (रा. पिंटू हॉटेलच्या मागे, लातूर)

यांना अटक केली. आरोपींकडून चोरी केलेल्या मोटारसायकली स्क्रॅप करून वेगवेगळे केलेले सहा मोटारसायकलींचे सुटे भाग जप्त करण्यात आले. या कारवाईत पोलिसांनी एक मोटारसायकल व सहा मोटारसायकलींचे स्क्रॅप केलेले सुटे भाग असा एकूण १ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून गांधी चौक पोलीस ठाण्यातील मोटारसायकल चोरीचे एकूण ७ गुन्हे उघडकीस आले आहेत. या प्रकरणी पुढील तपास गांधी चौक पोलीस करीत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande