

अकोला, 08 मार्च (हिं.स.)।
प्रत्येक स्त्री ही करुणा, साहस आणि शक्तीचे प्रतीक आहे हा संदेश देत आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त केंद्रीय क्रीडा मंत्रालय, मेरा युवा भारत केंद्र, व जिल्हा प्रशासनाच्या वतीने वसंत देसाई क्रीडांगण येथे अस्मिता लीगचे आयोजन आज करण्यात आले.
विविध शाळा–महाविद्यालयांच्या विद्यार्थिनी, युवती व महिला यांनी स्पर्धेत सहभागी होत स्त्री शक्तीचे दर्शन घडवले.
विद्यार्थिनी व महिलांसाठी १३ वर्षांखालील, १३ ते १८ वर्ष, १८ हून अधिक अशा तीन वयोगटात धावण्याची स्पर्धा झाली. १०० मीटर, २०० मीटर, ४०० मीटर इतक्या अंतराच्या या स्पर्धांमध्ये जिल्ह्यातील युवती व महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. क्रीडा क्षेत्रात उत्तम कामगिरी बजावलेल्या मान्यवर महिला क्रीडापटू, विद्यार्थिनी क्रीडापटू यांच्या हस्ते मशाल पेटवून उपक्रमाचा शुभारंभ झाला.
या उपक्रमासाठी जिल्हा क्रीडा कार्यालय, स्काऊट-गाईड कार्यालय, शिक्षणाधिकारी कार्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, विविध शाळा-महाविद्यालये, महिला आर्थिक विकास महामंडळ यासह विविध संस्थांचा सहभाग मिळविण्यात आला.
राज्य क्रीडा मार्गदर्शक नलिनी जाधव, जिल्हा क्रीडा अधिकारी सतीशचंद्र भट्ट, स्काऊट गाईड जिल्हा संघटक किरण लहाने, जयमालाताई जाधव, जिल्हा क्रीडा कार्यालयाचे राजेश गावंडे,मेरा युवा भारत केंद्राचे मदन भरगाटे यासह क्रीडा मार्गदर्शक उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे