
नवी दिल्ली, 14 एप्रिल (हिं.स.) क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने भारताविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी संघाची घोषणा केली. लॉरा वूलवार्डच्या नेतृत्वाखालील १५ सदस्यीय संघाची या मालिकेसाठी निवड करण्यात आली आहे. ही मालिका १७ ते २७ एप्रिल दरम्यान खेळवली जाईल. टेबोगो मचेके ही एक नवोदित क्रिकेटपटू असून, दक्षिण आफ्रिकेच्या संघात तिची ही पहिलीच वेळ आहे. दुखापतग्रस्त कराबो मेसोच्या जागी मचेकेला संघात स्थान मिळाले आहे. वेगवान गोलंदाज मसाबाता क्लासच्या जागी अष्टपैलू एलिस-मारी मार्क्सचेही संघात पुनरागमन झाले आहे. क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने अलीकडेच मारी मार्क्सला तिच्या करारातून मुक्त केले होते.
दक्षिण आफ्रिकेने न्यूझीलंड दौऱ्यावर गेलेल्या संघात केवळ दोन बदल केले आहेत. भारताविरुद्धची ही मालिका जून-जुलैमध्ये इंग्लंडमध्ये होणाऱ्या टी-२० विश्वचषकाची तयारी म्हणून खेळवली जाईल. अनुभवी क्रिकेटपटू डेन व्हॅन निकर्क आणि अष्टपैलू खेळाडू मॅरिझॅन कॅप या मालिकेत नाहीत. निकर्क दुखापतीमुळे संघाबाहेर आहे, तर कॅप आजारपणामुळे पुनर्वसन करत आहे. परिणामी, अनेके बॉशचे स्थान अबाधित आहे. न्यूझीलंड दौऱ्यावर दक्षिण आफ्रिकेने टी-20 मालिका 4-1 ने गमावली होती. मागील दोन टी-२० विश्वचषकांच्या अंतिम फेरीत खेळलेल्या प्रोटीज संघाला आगामी स्पर्धेपूर्वी तयारीत कमालीची सुधारणा करावी लागणार आहे.
भारताविरुद्धच्या मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेचा टी-20 संघ
लॉरा वूलवार्ड (कर्णधार), ॲनेके बॉश, तझमिन ब्रिट्स, नादिन डी क्लर्क, ॲनेरी डर्कसेन, अयांडा हलुबी, सिनालो जाफ्ता, अयाबोंगा खाका, सुने लुस, तेबोगो माचेके, एलिस-मेरी मार्क्स, नॉनकुलुलेको म्लाबा, कायला रेनेके, तुल्य सेलोके, तुल्योन च्यून.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे