आयपीएलमध्ये विदर्भ एक्सप्रेस प्रफुल्ल हिंगेचे स्वप्नवत पदार्पण
हैदराबाद, 14 एप्रिल (हिं.स.)प्रफुल्ल हिंगे...... हे नाव गेल्या काही दिवसात केवळ मोजक्या लोकांनाच माहीत होते. जे क्रिकेटचे कट्टर चाहते आहेत आणि नियमितपणे आयपीएल पाहतात. पण अवघ्या काही तासांतच, हा क्रिकेटपटू संपूर्ण भारतात घराघरात पोहोचला आहे. आपल्या
प्रफुल्ल हिंगे


हैदराबाद, 14 एप्रिल (हिं.स.)प्रफुल्ल हिंगे...... हे नाव गेल्या काही दिवसात केवळ मोजक्या लोकांनाच माहीत होते. जे क्रिकेटचे कट्टर चाहते आहेत आणि नियमितपणे आयपीएल पाहतात. पण अवघ्या काही तासांतच, हा क्रिकेटपटू संपूर्ण भारतात घराघरात पोहोचला आहे. आपल्या आयपीएल पदार्पणाचे पहिले षटक कशा प्रकारे टाकणार हे प्रफुल्ल हिंगेने आधीच ठरवले होते. त्याने कुठेतरी लिहून ठेवले होते, जेव्हा कधी तो पदार्पण करेल, तेव्हा तो आपल्या पहिल्याच सामन्यात चार किंवा पाच विकेट्स घेईल, आणि नेमके घडलेही तसेच.

आयपीएलच्या 19 हंगामाच्या इतिहासात डावाच्या पहिल्याच षटकात तीन विकेट्स घेणारा तो पहिला गोलंदाज ठरला आहे. प्रफुल्ल हिंगेने आपल्या पहिल्याच षटकात सर्व फलंदाजांना शून्यावर बाद केले. वैभव सूर्यवंशी त्याचा पहिला बळी ठरला. त्यानंतर ध्रुव जुरेल आणि लुआन-ड्रे प्रिटोरियस शून्यावर बाद झाला. आपल्या पुढच्याच षटकात प्रफुल्लने कर्णधार रियान परागला चार धावांवर बाद केले. आणि याबरोबरच हैदराबादचा विजय निश्चित झाला. प्रफुल्लने आपल्या चार षटकांत ३४ धावा देऊन चार विकेट्स घेतले.

सामनावीर म्हणून निवड झाल्यानंतर तो म्हणाला, मी (एका अविस्मरणीय पदार्पणाबद्दल) विचार केला होता. गेल्या वर्षी मी कुठेतरी लिहिले होते की, जेव्हा कधी मी माझा पहिला सामना खेळेन, तेव्हा मी नक्कीच चार किंवा पाच विकेट्स घेईन. मला पॉवरप्लेमध्ये शक्य तितके वर्चस्व गाजवायचे होते. माझा ‘इच्छापूर्ती’वर विश्वास आहे. इतरांबद्दल मला माहीत नाही, पण माझा त्यावर नक्कीच विश्वास आहे.

प्रफुल्ल हिंगे यांनी वैभव सूर्यवंशीच्या विकेटला आपली आवडती विकेट म्हणून सांगितले. तो म्हणाला, सर्वोत्तम विकेट सूर्यवंशीची होती कारण तो सध्या फॉर्मात आहे. मी काही लोकांना आधीच सांगितले होते की, मी त्याला पहिल्याच चेंडूवर बाद करेन, मग ते बाउन्सरने असो किंवा इतर कोणत्याही पद्धतीने. मला फक्त पहिल्याच चेंडूवर त्याची विकेट हवी होती. हीच माझी योजना होती.

प्रफुल्ल हिंगेने 'प्लेअर ऑफ द मॅच' पुरस्कार आपल्या कुटुंबाला समर्पित केला. तो म्हणाला, मी वयाच्या १३ व्या वर्षी क्रिकेट खेळायला सुरुवात केली. त्यावेळी मला लेदर-बॉल क्रिकेट म्हणजे काय हेसुद्धा माहीत नव्हते. जेव्हा मी १३ वर्षांचा होतो, तेव्हा मी माझ्या वडिलांना सांगितले की मला एका क्लबमध्ये सामील व्हायचे आहे. मी खूप लहान आहे असे सांगून त्यांनी दोन-तीन वेळा नकार दिला. पण कसेतरी, तिथूनच या सगळ्याची सुरुवात झाली. त्यानंतर मी खेळतच राहिलो. आज इथे उभे राहून खूप छान वाटत आहे. मला हा पुरस्कार माझ्या कुटुंबाला समर्पित करायचा आहे.

प्रफुल्ल हिंगेचा जन्म १८ जानेवारी २००२ रोजी महाराष्ट्रातील नागपूर येथे झाला. तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये विदर्भ संघाकडून खेळतो. आयपीएल २०२६ मध्ये सनरायझर्स हैदराबादकडून पदार्पण करण्यापूर्वी, त्याने १० प्रथम-श्रेणी सामने खेळून २७ विकेट्स घेतल्या आहेत. त्याने ६ लिस्ट ए सामने खेळून ५ विकेट्स घेतल्या आहेत. टी२० क्रिकेटमधील त्याचा अनुभव खूपच मर्यादित आहे. त्याने केवळ एक सामना खेळून एक विकेट घेतली आहे. हैदराबादने लिलावात त्याला ३० लाख रुपयांना आपल्या संघात सामील करून घेतले होते.

नागपूरचा प्रफुल्ल पूर्वी फलंदाजी करायचा, पण वडिलांच्या आग्रहामुळे तो वेगवान गोलंदाजीकडे वळला. त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला त्याच्या गोलंदाजीच्या शैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले होते, पण त्याने त्यात सुधारणा करण्यासाठी अथक परिश्रम घेतले. प्रफुल्ल २०२२ पासून चेन्नईतील एमआरएफ पेस फाउंडेशनमध्ये प्रशिक्षण घेत आहे. २०२४ मध्ये तो १५ दिवसांच्या शिबिरासाठी ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेन येथेही गेला होता.

आयपीएलमध्ये प्रफुल्लच्या निवडीचे श्रेय हैदराबादचे गोलंदाजी प्रशिक्षक, वरुण ॲरॉन यांना जाते. त्यांनी लिलावापूर्वी त्याला एसआरएचच्या चाचण्यांसाठी बोलावले होते. ते हिंगेच्या गोलंदाजीने प्रभावित झाले आणि त्यांनी त्याला हैदराबाद संघात सामील करून घेतले. प्रफुल्लने आपल्या पहिल्या ३ षटकांत १८ धावा देऊन ४ विकेट्स घेतल्या. आणि आपल्यावरील विश्वास सार्थ करुन दाखवला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande