
हैदराबाद, 14 एप्रिल (हिं.स.)इशान किशनची धडाकेबाज खेळी आणि प्रफुल्ल हिंगे तसेच शकिब हसनच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्सचा ५७ धावांनी पराभव केला. हैदराबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात, नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर हैदराबादने २० षटकांत ६ विकेट्स गमावून २१६ धावा केल्या. तर राजस्थानला १९ षटकांत सर्वबाद केवळ १५९ धावाच करता आल्या.
या पराभवामुळे राजस्थान रॉयल्सच्या सलग चार सामन्यांच्या विजयाची मालिकाही संपुष्टात आली. पाचपैकी एक सामना गमावूनही राजस्थान गुणतालिकेत अव्वल स्थानावर कायम आहे, तर हैदराबादने पाचपैकी दोन सामने जिंकून चौथे स्थान पटकावले आहे.नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर सनरायझर्स हैदराबादने सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर अभिषेक शर्मा (०) याला गमावले. त्यानंतर इशान किशनने ट्रॅव्हिस हेडसोबत दुसऱ्या विकेटसाठी ५५ धावांची भागीदारी करून संघाला संकटातून बाहेर काढले. ट्रॅव्हिस हेडने १८ चेंडूंमध्ये तीन चौकारांसह १८ धावा केल्या. त्याच्या बाद झाल्यानंतर, इशानने हेनरिक क्लासेनसोबत ३९ चेंडूंमध्ये ८८ धावांची भागीदारी करून संघाला मजबूत स्थितीत आणले.कर्णधार इशान सहा षटकार आणि आठ चौकारांसह ४४ चेंडूंमध्ये ९१ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला, तर क्लासनने ४० धावा केल्या. नितीश रेड्डीने २८ धावा केल्या आणि सलील अरोरा २४ धावांवर नाबाद राहिला. विरोधी संघाकडून जोफ्रा आर्चरने दोन विकेट्स घतल्या, तर संदीप शर्मा, तुषार देशपांडे आणि रियान पराग यांनी प्रत्येकी एकेक घेतली.
राजस्थान रॉयल्सचा संघ १९ षटकांत केवळ १५९ धावांवर सर्वबाद झाला. पदार्पण करणाऱ्या प्रफुल्ल हिंगेने आपल्या पहिल्याच षटकात तीन विकेट्स घेत राजस्थान रॉयल्सला अडचणीत आणले. दुसऱ्या षटकात संघाने यशस्वी जैस्वाल (१) याचीही विकेट गमावली. पुढच्याच षटकात कर्णधार रियान पराग (०) सुद्धा बाद झाला. परिस्थिती अशी होती की, संघाने ३ षटकांत केवळ ९ धावांत ५ गडी गमावले होते. त्यानंतर अनुभवी फलंदाज रवींद्र जडेजाने डोनोव्हान फरेरासोबत ७२ चेंडूंमध्ये सहाव्या विकेटसाठी ११८ धावांची भागीदारी करून संघाला विजयाच्या मार्गावर आणले. पण ही भागीदारी तुटल्याने संघ पुन्हा अडचणीत आला.
फरेरा ४४ चेंडूंमध्ये ३ षटकार आणि ७ चौकारांसह ६९ धावांवर बाद झाला, तर जडेजाने ३२ चेंडूंमध्ये ५ चौकारांसह ४५ धावा केल्या. तुषार देशपांडेने संघाच्या खात्यात २५ धावांचे योगदान दिले. विरोधी संघाकडून प्रफुल्लने ३४ धावांत ४ विकेट्स घेतल्या, तर शकिब हुसेनने २४ धावांत ४ विकेट्स घेतल्या. याशिवाय, इशान मलिंगाला २ विकेट्स घेण्यात यश आलं.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे