
नांदेड, 08 मार्च (हिं.स.)।
नांदेड जिल्हा प्रशासनाकडून कॉपीमुक्तीसाठी राबवलेल्या मोहिमेचे कौतुक करीतव प्रशासनाच्या अतिरेकाबद्दल जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली आहे
नांदेड जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांना काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस डॉ. श्रावण रॅपणवाड यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कॉपीमुक्त परीक्षेचे स्वागत आहे परंतु कॉपीमुक्तीच्या नावाखाली प्रशासनाच्या अतिरेकी दबावापोटी विद्यार्थी भयभीत झाले आहेत. प्रचंड दबावापोटी विद्यार्थी व्यवस्थित परीक्षा देऊ शकत नाहीत, पर्यायाने विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे. कॉपीमुक्तीचे वेगळे पर्याय वापरून परीक्षा केंद्र व परीक्षा हॉलमध्ये विद्यार्थ्यांवर दबाव येणार नाही याची काळजी प्रशासनाने घ्यावी. केवळ नांदेड जिल्ह्यामध्ये अतिशय कडक धोरण राबवून शेजारच्या जिल्ह्यात मात्र सर्व सुळसुळाट चालू आहे. नांदेड जिल्ह्यातीलही बाकी सर्व क्षेत्रात अनागोंदीचा सुळसुळाट असताना फक्त विद्यार्थ्यांवरच गंडांतर का? दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय पातळीवर नीट व जेईई स्पर्धेत उतरताना आत्मविश्वास, ग्रुप व अॅग्रीगेट ची आवश्यकता आहे. कॉपीमुक्त पण फ्री फेअर वातावरणात परीक्षा घेतली गेली तर विद्यार्थी चांगला स्कोर करू शकतील. प्रत्यक्ष विद्यार्थ्यांवरती परीक्षा हॉलमध्ये प्रशासनाच्या अतिरेकामुळे प्रचंड दबाव निर्माण होऊन गुणांकन कमी होण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना परीक्षा मंडळाकडून अतिरिक्त बोनस गुणांची मागणी या निवेदनातून करण्यात आलेली आहे. प्रशासनाच्या अतिरेकी दबावामुळे विद्यार्थी व पालक प्रचंड तणावात असून त्यांना दिलासा देण्याचे काम प्रशासनाने करावे असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis