
नाशिक, 09 मार्च (हिं.स.) । प्रादेशिक परिवहन कार्यालय, नाशिक येथे जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला. यावेळी महिलांनी जिद्द, कष्ट व आत्मविश्वासाच्या बळावर वाहतूक व रस्ता सुरक्षा क्षेत्रात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. अशा शब्दात उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राजश्री गुंड यांनी महिलांचे कौतुक केले.
या कार्यक्रमास प्रादेशिक परिवहन कार्यालयातील सर्व महिला अधिकारी व कर्मचारी तसेच मोटार ड्रायव्हिंग स्कूल वेल्फेअर असोसिएशनचे पदाधिकारी, संचालक व संचालिका उपस्थित होते.या कार्यक्रमात प्रादेशिक परिवहन कार्यालयातील महिला अधिकारी व कर्मचारी तसेच मोटार ड्रायव्हिंग स्कूलच्या संचालिका व प्रशिक्षिका, महिला स्कूल बस चालक, महिला ऑटो रिक्षा व पिंक ई-रिक्षा चालक यांचा वाहतूक व रस्ता सुरक्षा क्षेत्रातील योगदानाबद्दल सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. मोटार ड्रायव्हिंग स्कूल वेल्फेअर असोसिएशन, नाशिक यांच्या वतीनेही प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा जागतिक महिला दिनानिमित्त सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष श्रीमती गुंड यांनी सांगितले की, पूर्वी वाहन चालविणे, वाहतूक व्यवस्था सांभाळणे तसेच रस्त्यावर व्यावसायिक चालक म्हणून काम करणे हे क्षेत्र प्रामुख्याने पुरुषांचे मानले जात होते. मात्र महिलांनी जिद्द आणि आत्मविश्वासाच्या जोरावर या क्षेत्रातही आपली छाप पाडली असून समाजासाठी प्रेरणादायी कार्य केले असल्याचे त्यांनी सांगितलेकार्यक्रमाचे सुत्रसंचालन सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक राजश्री घावटे यांनी केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV