
परभणी, 09 मार्च (हिं.स.)।
परभणी शहर महानगरपालिकेच्या वतीने महापौर सय्यद इक्बाल यांनी महानगरपालिका अंतर्गत कार्यरत आशा स्वयंसेविकांची सोमवारी (दि. ९) बैठक घेऊन संवाद साधला. यावेळी जागतिक महिला दिनानिमित्त आशा वर्कर महिलांना शुभेच्छा देत त्यांच्या कार्याचे कौतुकही करण्यात आले. या बैठकीस शिवसेनेच्या जिल्हा महिला संघटक प्रमुख अंबिका डहाळे, सौ. वंदना कदम तसेच आरोग्य अधिकारी डॉ. कल्पना सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती. बैठकीत आशा वर्करांनी आरोग्य वर्धिनी केंद्रामार्फत नागरिकांना दिल्या जाणाऱ्या आरोग्य सुविधांचा अधिक प्रभावीपणे लाभ पोहोचवावा, असे आवाहन महापौरांनी केले. विशेषतः गरोदर मातांच्या घरोघरी जाऊन त्यांची नियमित तपासणी करणे, आवश्यक गोळ्या-औषधे व लसीकरणाबाबत मार्गदर्शन करणे, तसेच आरोग्य वर्धिनी केंद्रांमार्फत त्यांची नियमित आरोग्य तपासणी करण्यावर भर देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.तसेच नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करण्याचे आवाहनही करण्यात आले. प्रत्येक नागरिकाने परिसर स्वच्छ ठेवावा, घरात कचराकुंडी ठेवावी आणि घंटागाडी आल्यावर त्यात कचरा टाकावा, याबाबत आशा वर्करांनी नागरिकांना जागरूक करावे, असे सांगण्यात आले. स्वच्छतेविषयक उपक्रमांचे नियोजन लवकरच करण्यात येणार असल्याचेही महापौरांनी स्पष्ट केले.यावेळी अंबिकाताई डहाळे यांनी आशा वर्कर महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देत त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे सांगितले. नागरिकांपर्यंत आरोग्यविषयक सुविधा पोहोचविण्यासाठी महापौरांच्या माध्यमातून आवश्यक मदत केली जाईल, असेही त्यांनी नमूद केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis