शेतकऱ्यांसाठी लढा सुरूच ठेवणार – ऍड. अजित काळे
परभणी, 08 मार्च (हिं.स.)। परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेकडो कोटी रुपयांचा पिक विमा मिळवून देण्यासाठी न्यायालयीन लढा देणारे ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. अजित काळे यांचा शेळगाव महाविष्णू (ता. सोनपेठ) येथे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात
शेतकऱ्यांसाठी न्यायालयीन व रस्त्यावरील लढा सुरूच ठेवणार – ॲड. अजित काळे


परभणी, 08 मार्च (हिं.स.)। परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेकडो कोटी रुपयांचा पिक विमा मिळवून देण्यासाठी न्यायालयीन लढा देणारे ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. अजित काळे यांचा शेळगाव महाविष्णू (ता. सोनपेठ) येथे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना त्यांनी शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी न्यायालयीन लढ्यासोबतच रस्त्यावरील संघर्षही सुरूच ठेवणार असल्याचा निर्धार व्यक्त केला.

२०२० मधील पिक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा व्हावी यासाठी परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या वतीने उच्च न्यायालयात निःशुल्क दावा लढवून शेतकऱ्यांना शेकडो कोटी रुपये व्याजासह मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणारे छत्रपती संभाजीनगर येथील उच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ तसेच शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष ॲड. अजित काळे यांच्या सत्कारासोबतच “शेतकरी हक्क परिषद” देखील आयोजित करण्यात आली होती.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष कालीदास आपेट होते. तर सुधीर बिंदू, अमृत शिंदे, बंडू सोळंके, दगडूबा वजीर, इरशाद चाँद पाशा, किरण चक्रपाणी, शिवाजी बोबडे आणि अनंत काळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी जिल्ह्यातील अनेक शेतकरी, कार्यकर्ते आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमात शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी सातत्याने लढा देत पिक विमा मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्याबद्दल ॲड. अजित काळे यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.

यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना ऍड. अजित काळे म्हणाले की, न्यायव्यवस्था कागदोपत्री प्रक्रियेवर चालत असली तरी सामान्य माणसाला न्याय मिळवण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. पिक विमा हा शेतकऱ्यांवर कोणताही उपकार नसून तो केंद्र व राज्य शासनाचे कर्तव्य आहे. महाराष्ट्रातील पिक विमा योजनांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असून मंत्री, अधिकारी आणि कर्मचारी यांची घरे भरली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. शासनाच्या योजना समाजापर्यंत प्रभावीपणे पोहोचतात की नाही, यावर लक्ष ठेवणारी स्वतंत्र यंत्रणा निर्माण झाली नाही, हे दुर्दैव असल्याचे त्यांनी नमूद केले. शेतकरी संघटित नसल्यामुळे अनेक प्रश्न दुर्लक्षित राहतात. त्यामुळे धाडसाने प्रश्न विचारणे आणि हक्कासाठी आवाज उठवणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर न्यायालयीन लढ्यासोबतच रस्त्यावरील संघर्ष सुरूच ठेवणार असल्याची ग्वाही त्यांनी सत्काराला उत्तर देताना दिली. तसेच शेतकऱ्यांनी पक्षीय राजकारण बाजूला ठेवून आपल्या प्रश्नांसाठी एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी केले.कार्यक्रमात शेतकरी चळवळीतील हेमचंद्र शिंदे, विश्वंभर गोरवे आणि कालीदास आपेट यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अवधूत गिरी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शेळगाव येथील ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande