

मुंबई, 11 एप्रिल (हिं.स.)। केंद्रीय माहिती आणि प्रसारण सचिव चंचल कुमार यांनी मुंबईत राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ अर्थात एनएफडीसी संकुलाला भेट दिली. पदभार स्वीकारल्यानंतर एनएफडीसी मुख्यालयाला दिलेल्या या पहिल्या भेटीदरम्यान, सचिवांनी नॅशनल म्युझियम ऑफ इंडियन सिनेमा (एनएमआयसी) आणि तेथेच असलेल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीज (आयआयसीटी) कॅम्पसच्या सुविधांची पाहणी केली.
नॅशनल म्युझियम ऑफ इंडियन सिनेमा इथे भारतीय चित्रपटसृष्टीच्या समृद्ध वारशाचा इतिहास, कला आणि तंत्रज्ञान एकत्र आले असून, ही चित्रपटप्रेमी आणि संशोधक दोघांसाठीही एक पर्वणी आहे. या प्रदर्शनात भारतीय चित्रपटांशी संबंधित भित्तीपत्रके आणि कलाकृती, चित्रपटनिर्मितीची उपकरणे आणि अभ्यागतांसाठी अनेक आकर्षक उपक्रमांचा समावेश आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या सचिवांनी संपूर्ण संग्रहालयाचा फेरफटका मारला आणि 'गुलशन महल'ला देखील भेट दिली. इथे 'वेव्हज् 2025' मध्ये माहिती आणि प्रसारण मंत्रालयाद्वारे स्थापित केलेल्या 'भारत पॅव्हेलियन'चे मुख्य घटक ठेवण्यात आले असून, ते आता नॅशनल म्युझियम ऑफ इंडियन सिनेमामध्ये स्थलांतरित करण्यात आले आहेत. भारतीय चित्रपटसृष्टीचा समृद्ध वारसा अधोरेखित करणारी आणि त्याचे जतन आणि प्रसार करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती देणारी ही प्रदर्शने त्यांनी पाहिली.
यानंतर त्यांनी एनएफडीसी संकुलात आयआयसीटीचे वर्ग आणि सुविधांना भेट दिली, तिथे त्यांनी विद्यार्थी आणि प्राध्यापकांशी संवाद साधला. त्यांनी विद्यार्थ्यांसाठी असलेल्या अत्याधुनिक सुविधांचीही पाहणी केली, त्यामध्ये संगणक हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरच्या सर्वात प्रगत श्रेणीचा समावेश आहे, त्यामुळे कोणत्याही सर्जनशील प्रकल्पाला हार्डवेअरची मर्यादा उरणार नाही याची हमी दिली जाते. त्यांना कंटेंट निर्मिती प्रयोगशाळांविषयी माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांना प्रेरणादायी आणि तांत्रिकदृष्ट्या प्रगत वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी या कॅम्पसची सूक्ष्मपणे रचना करण्यात आली आहे. सहयोगी शिक्षण अवकाश आणि उच्च तंत्रज्ञानयुक्त प्रयोगशाळांपासून ते मनोरंजन क्षेत्रे आणि अभ्यासासाठी शांत कोपऱ्यांपर्यंत, प्रत्येक सुविधा शैक्षणिक उत्कृष्टता वाढवण्यासाठी आणि एव्हीजीसी- एक्स आर क्षेत्रात सर्जनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी तयार करण्यात आली आहे.
यावेळी मुंबईतील माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते, त्यामध्ये पीआयबी पश्चिम विभागाच्या महासंचालक स्मिता वत्स शर्मा; एनएफडीसीचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश मगदूम; आयआयसीटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विश्वास देवसकर; आणि सीबीएफसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र सिंह यांचा समावेश होता. या विभागांच्या सुरू असलेल्या प्रकल्पांचा आणि उपक्रमांचा आढावा देखील यावेळी सादर करण्यात आला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule