
सोलापूर, 11 एप्रिल (हिं.स.)।
एक ट्रान्सफार्मर बिघडला म्हणून दुसऱ्या ट्रान्सफार्मवरला त्या गावांचे कनेक्शन जोडले. वाढलेल्या कनेक्शनमुळे तोही ट्रान्सफार्मर बिघडला. ट्रान्सफार्मर सुरू करण्यासाठी रोज ४ बॅरल ऑईलची गरज आहे. महावितरणकडे ऑईलच नसल्याने माळशिरस तालुक्यातील १० गावे अंधारात आहेत. चार दिवसांपर्यंत सुरू असलेला सिंगल फेजचा विजपुरवठाही बंद झाला आहे. माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागातील दहा गावांतील लाखाहून अधिक ग्रामस्थांना १० दिवसांपासून अंधारात राहावे लागत असून, ५ एमव्हीए क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त झाल्याने विद्युतपुरवठा पूर्णपणे खंडित झाला आहे
या ट्रान्सफॉर्मरवर असलेल्या लोणंद, फडतरी, लोंढे-मोहितेवाडी, पिंपरी, मोरोची, मांडवे, ४४ फाटा, बंडगर खोरी, तामशीद वाडी, पांढरे मळा, राऊत वस्ती, रुपनवर वस्ती, हुलगे वस्ती, शिंदे वस्ती, बिरोबा नगर यांसह अनेक गावांचा विद्युतपुरवठा खंडित झाला. बिघाडाची माहिती तातडीने वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली असून, संबंधित सातारा येथील एजन्सीकडे दुरुस्तीबाबत पत्रव्यवहार करण्यात आला आहे. वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी या ट्रान्सफॉर्मरवरील भार दुसऱ्या ट्रान्सफॉर्मरवर वळविण्यात आला. मात्र, त्यामुळे दुसऱ्या ट्रान्सफॉर्मरमध्येही बिघाड निर्माण झाला असून, त्यासाठी चार बॅरल ऑइलची आवश्यकता आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड