
पुणे, ११ एप्रिल (हिं.स.) : सध्याच्या जागतिक परिस्थितीत ‘सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट’ या पाश्चात्य विचारसरणीमुळे संघर्ष आणि अस्थिरता वाढत असल्याचे मत व्यक्त करत, त्याऐवजी ‘सर्व्हे भवन्तु सुखिनः’ हा सर्वसमावेशक भारतीय विचार जगभर पोहोचवण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय सहसंपर्क प्रमुख भारत भूषण यांनी केले.
रा. स्व. संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त वडगावशेरी परिसरातील वैचारिक, शैक्षणिक आणि विधी क्षेत्रातील नागरिकांसाठी ‘संघ शताब्दी मंथन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम खराडी येथील ढोले पाटील महाविद्यालय येथे पार पडला. यावेळी भारत भूषण प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.
संघाच्या स्थापनेमागील उद्देश स्पष्ट करताना त्यांनी डॉ. केशव बलिराम हेडगेवार यांच्या कार्याचा आढावा घेतला. “संघाचे कार्य केवळ गर्दी जमवणे नसून, दैनंदिन शाखांच्या माध्यमातून सातत्याने व्यक्तिनिर्माण करणे हा त्यामागील मूलभूत हेतू आहे,” असे ते म्हणाले. स्वातंत्र्यलढ्यातील हेडगेवार यांच्या योगदानातून राष्ट्रभक्तीची प्रेरणा मिळते, असेही त्यांनी नमूद केले.
देशाला परमवैभवाप्रत नेण्यासाठी समाजातील सज्जन शक्तींनी प्रेक्षक न राहता सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. संघाच्या विविध कार्यक्षेत्रांची माहिती देत समाजातील सर्व घटकांना जोडण्यावर त्यांनी भर दिला.
कार्यक्रमाच्या पूर्वार्धात संजय कुलकर्णी यांनी संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त राबविण्यात येणाऱ्या ‘पंच परिवर्तन’ अभियानाचे महत्त्व स्पष्ट केले. कुटुंब प्रबोधन, सामाजिक समरसता, स्वदेशी, पर्यावरण संवर्धन आणि नागरिक कर्तव्य या पाच मूल्यांची जोपासना राष्ट्रनिर्मितीसाठी आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृष्णकांत सातव यांनी केले, तर सूत्रसंचालन मिलिंद थोरात यांनी केले. कार्यक्रमाची सांगता ‘वंदे मातरम्’ने झाली. शहरातील शिक्षणतज्ज्ञ, वकील आणि विचारवंत मोठ्या संख्येने उपस्थित होते.
-----------------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु