
महापालिका शिक्षण विभागाची आढावा बैठक
अमरावती, १५ एप्रिल (हिं.स.) : महानगरपालिका शिक्षण विभागाची आढावा बैठक नुकतीच आयुक्त वर्षा लड्डा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत महानगरपालिका शाळांची संख्या, विद्यार्थ्यांची उपस्थिती, विविध शैक्षणिक उपक्रम तसेच शाळांमधील भौतिक व आधुनिक सुविधांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
बैठकीस अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, उपायुक्त नरेंद्र वानखडे, शिक्षण अधिकारी डॉ. प्रकाश मेश्राम, जनसंपर्क अधिकारी भूषण पुसदकर, उपअभियंता लक्ष्मण पावडे, शाळा निरीक्षक योगेश पखाले आणि सहाय्यक कार्यक्रम अधिकारी पंकज सपकाळ यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.
यावेळी आयुक्त वर्षा लड्डा यांनी पावसाळ्यापूर्वी सर्व शाळांमधील आवश्यक किरकोळ दुरुस्ती तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. विद्यार्थ्यांना अध्ययन-अध्यापन करताना कोणतीही अडचण किंवा अपघाताचा धोका निर्माण होऊ नये, यासाठी ही उपाययोजना महत्त्वाची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
तसेच महानगरपालिका अंतर्गत चालवल्या जाणाऱ्या शाळांची एकूण संख्या, विविध व्यवस्थापनांच्या शाळांची माहिती, विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या सुविधा, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणारे उपक्रम आणि डिजिटल सुविधांचा विस्तार यावरही सखोल चर्चा करण्यात आली.
शाळांमध्ये उपलब्ध असलेल्या सुविधांमध्ये डिजिटल बोर्ड, वॉटर कुलर, सीसीटीव्ही कॅमेरे, संगणक कक्ष, ग्रंथालय, प्रयोगशाळा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, साऊंड सिस्टिम आणि क्रीडा साहित्य यांचा समावेश आहे. तसेच नवीन इमारतींचे बांधकाम, शौचालये व सुरक्षा भिंतींची उभारणी आणि दुरुस्ती या कामांचाही आढावा घेण्यात आला.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसह दर्जेदार शिक्षणासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यावर महानगरपालिकेचा भर असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी