राज्यसभा खासदार अशोक मित्तल यांच्या घरासह अनेक ठिकाणी ईडीचे छापे
चंदीगड , 15 एप्रिल (हिं.स.)।पंजाबमधील राज्यसभा खासदार अशोक कुमार मित्तल यांच्या निवासस्थानी अंमलबजावणी संचालनालय (ईडी)च्या पथकाने छापा टाकला आहे. बुधवारी सकाळी ईडीच्या पथकांनी जालंधर आणि फगवाडा येथे त्यांच्या घरांवर, शैक्षणिक संस्थांवर आणि व्यावसाय
राज्यसभा खासदार अशोक मित्तल यांच्या घरासह अनेक ठिकाणी ईडीचे छापे


चंदीगड , 15 एप्रिल (हिं.स.)।पंजाबमधील राज्यसभा खासदार अशोक कुमार मित्तल यांच्या निवासस्थानी अंमलबजावणी संचालनालय (ईडी)च्या पथकाने छापा टाकला आहे. बुधवारी सकाळी ईडीच्या पथकांनी जालंधर आणि फगवाडा येथे त्यांच्या घरांवर, शैक्षणिक संस्थांवर आणि व्यावसायिक ठिकाणांवर एकाच वेळी छापेमारी केली. सकाळी सुमारे ९ वाजता सुरू झालेल्या या कारवाईत दिल्लीहून आलेल्या ईडीच्या पथकांनी अनेक ठिकाणी वेढा घातला. मित्तल यांच्या निवासस्थानाबाहेर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, आत अधिकाऱ्यांकडून कागदपत्रे आणि आर्थिक व्यवहारांची सखोल तपासणी सुरू आहे.

ईडीची पथके एलपीयू तसेच लवली ग्रुपशी संबंधित अनेक संस्थांपर्यंत पोहोचली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, लवली ऑटोज, लवली स्वीट्स आणि लवली डिस्टन्स एज्युकेशन सेंटर यांचाही तपासात समावेश आहे. इतकेच नव्हे तर मित्तल कुटुंबाशी संबंधित निवासी आणि व्यावसायिक संकुलांवरही छाननी सुरू आहे. त्यांच्या नातेवाईकांच्या ठिकाणांवरही ईडीची पथके कागदपत्रांची तपासणी करत आहेत.

सूत्रांच्या माहितीनुसार, ही संपूर्ण कारवाई विदेशी चलन व्यवस्थापन कायदा (फेमा) अंतर्गत कथित उल्लंघनाशी संबंधित प्रकरणात केली जात आहे. ईडी अधिकाऱ्यांचे विशेष लक्ष आर्थिक व्यवहार आणि परदेशी निधीशी संबंधित कागदपत्रांवर आहे. विशेष म्हणजे, आम आदमी पक्षाने अलीकडेच खासदार राघव चड्ढा यांना राज्यसभेतील उपनेतेपदावरून हटवून ही जबाबदारी अशोक मित्तल यांच्याकडे सोपवली होती. या निर्णयानंतर काहीच दिवसांत झालेली ही ईडीची कारवाई राजकीयदृष्ट्याही महत्त्वाची मानली जात आहे.

या छाप्याबाबत मुख्यमंत्री भगवंत मान यांनी ट्विट करत टोला लगावला. त्यांनी लिहिले, “भाजपाने पंजाब निवडणुकांची तयारी सुरू केली आहे… आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार अशोक मित्तल यांच्या घरावर आणि विद्यापीठात ईडीची रेड… टिपिकल मोदी स्टाईल… आम्ही असे पान नाही की झाडावरून तुटून पडू, वादळांना सांगून ठेवा की त्यांनी आपली मर्यादा ओळखावी.” तर आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनीही एक्सवर लिहिले, “मोदींनी पंजाबमध्ये निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. पण पंजाबचे लोक हे सहन करणार नाहीत. भाजपाला याचे करारे उत्तर दिले जाईल.”

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande