
बीड, 15 एप्रिल, (हिं.स.)। सांस्कृतिक कार्यक्रमांच्या तुलनेत साहित्यिक कार्यक्रमांना गर्दी कमीच असते. गर्दीपेक्षा दर्दी श्रोते आहेत म्हणून ब-याचदा वेळ मारून नेली जाते. पण लेखकांनीही याचा विचार जरूर करावा. वैचारिकतेऐवजी समाज बेगडी दुनियेवर का भाळतो याचेही आत्मचिंतन करण्याची वेळ येऊन ठेपलेली आहे असे प्रतिपादन म.सा.प.संभाजीनगर केंद्रीय कार्यकारिणी संचालक जेष्ठ साहित्यिक अनंत कराड यांनी केले.
गुरू शिष्य जयंती महोत्सवात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे उद्घाटक निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते, प्रांजल चिंतामणी, मधुकर राळेभात, काव्य संमेलनाचे अध्यक्ष जेष्ठ कवी सय्यद अलाऊद्दीन, शर्मिला गोसावी, डॉ. विठ्ठल जाधव, सुभाष सोनवणे, आनंदा साळवे हे उपस्थित होते. निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांनी महापुरूषांच्या विचाराचा वारसा पुढे चालविण्याचे उपस्थितांना आवाहन केले. तर शेरोशायरी आणि कवितेतून सय्यद आलाऊद्दीन यांनीही रसिकांशी संवाद साधला.
यावेळी निमंत्रितांचे काव्य संमेलनही संपन्न झाले. या संमेलनाचे बहारदार सूत्रसंचालन कर्जतच्या स्वाती पाटील व धाराशीवच्या अलका सपकाळ यांनी केले. या वेळी नागेश शेलार (कडा), विठ्ठल जाधव (शिरूर का.), महादेव लांडगे (आष्टी), निवृत्ती महाराज कानवडे (संगमनेर), बाळासाहेब घोरपडे (कर्जत), चंद्रकांत चाबुकस्वार (दौंड), रज्जाक शेख (श्रीरामपूर), हनुमंत येवले (राशीन), स्वाती ठुबे (पारनेर), सत्यवान मंडलिक (कराड), सविता गोलेकर (खर्डा), प्रा.विक्रम कांबळे (कर्जत), संदीप पाचारणे (कडा), नवनाथ केंदळे (कर्जत), अभिमन्यू इंगळे (धाराशीव), सारीका खराडे (कर्जत), गोविंद पाठक (परळी), तानाजी डाडर (कर्जत), रामदास गायकवाड (भूम), अजय भराटे (पाटोदा), सिद्धार्थ सावंत, रंगनाथ राळेभात, बालकवी सिद्धी जगताप, कल्याणी कुर्लेकर, रुद्राक्ष वारे यांनी आपल्या दर्जेदार रचना सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis