राष्ट्रपतींच्या कार्यक्रमात अमरावतीचा गौरव, विशेष शिक्षक नीरज तिवारी यांची द्विभाषिक म्हणून उल्लेखनीय कामगिरी
अमरावती, 17 एप्रिल (हिं.स.)।राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या वर्धा येथील कार्यक्रमात अमरावतीचे सुपुत्र नीरज सुरेश तिवारी यांनी द्विभाषिक (इंटरप्रीटर) म्हणून उत्कृष्ट कामगिरी बजावत शहराचा मान उंचावला. वर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी व
राष्ट्रपतींच्या कार्यक्रमात अमरावतीचा गौरव विशेष शिक्षक नीरज तिवारी यांची द्विभाषिक म्हणून उल्लेखनीय कामगिरी


अमरावती, 17 एप्रिल (हिं.स.)।राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या वर्धा येथील कार्यक्रमात अमरावतीचे सुपुत्र नीरज सुरेश तिवारी यांनी द्विभाषिक (इंटरप्रीटर) म्हणून उत्कृष्ट कामगिरी बजावत शहराचा मान उंचावला. वर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय येथे आयोजित दीक्षांत समारंभासाठी राष्ट्रपती उपस्थित होत्या. या कार्यक्रमात अमरावती येथील नूतन मूकबधीर विद्यालयातील विशेष शिक्षक नीरज तिवारी यांना द्विभाषिक म्हणून पाचारण करण्यात आले होते. त्यांनी राष्ट्रपतींच्या भाषणाचे सांकेतिक भाषेत प्रभावी रूपांतर करीत आपली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. राष्ट्रपतींच्या व्यासपीठावर उपस्थिती मिळणे हीच मोठी बाब असताना, त्यांच्या भाषणाचे द्विभाषिक म्हणून केलेले सादरीकरण ही तितकीच उल्लेखनीय कामगिरी ठरली आहे. यामुळे अमरावतीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. विशेष म्हणजे, नीरज तिवारी यांनी यापूर्वीही नागपूर येथे झालेल्या राष्ट्रपतींच्या कार्यक्रमात द्विभाषिक म्हणून काम केले आहे. सांकेतिक भाषेवर असलेली त्यांची मजबूत पकड आणि कार्यक्रमाचे अचूक विश्लेषण करण्याची क्षमता, यामुळे राज्यातील महत्त्वाच्या कार्यक्रमांमध्ये त्यांना वारंवार संधी दिली जाते. ते ही सेवा अनेकदा निःशुल्क देत असल्याचेही विशेष आहे. कार्यक्रमात उपस्थित मूकबधीर दिव्यांगांपर्यंत राष्ट्रपतींचा संदेश प्रभावीपणे पोहोचविण्यात त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरली. त्यांच्या या निवडीबद्दल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी, जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी बाळासाहेब रायबोले, सहायक सल्लागार पुरुषोत्तम शिंदे तसेच संस्थेचे पदाधिकारी, मुख्याध्यापक व कर्मचाऱ्यांनी त्यांचे कौतुक केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande