स्वाराती रुग्णालयात सुरक्षा समितीची विशेष आढावा बैठक संपन्न
बीड, 17 एप्रिल (हिं.स.)। अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्थेचा सविस्तर आढावा घेण्यासाठी रुग्णालय सुरक्षा समितीच्या विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. अधिष्ठाता डॉ. शंकर धपाटे यांच्या
स्वाराती रुग्णालयात सुरक्षा समितीची विशेष आढावा बैठक संपन्न


बीड, 17 एप्रिल (हिं.स.)।

अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्थेचा सविस्तर आढावा घेण्यासाठी रुग्णालय सुरक्षा समितीच्या विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. अधिष्ठाता डॉ. शंकर धपाटे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानांना रुग्णांच्या नातेवाईकांशी सौजन्याने वागण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या असून, अरेरावीचे प्रकार अजिबात खपवून घेतले जाणार नाहीत, असा स्पष्ट इशारा रुग्णालय प्रशासनाने दिला आहे. या बैठकीस उपअधिष्ठाता डॉ. राजेश कचरे, अधीक्षक डॉ. राकेश जाधव, पत्रकार अभिजीत गाठाळ, डॉ. नागेश अब्दागिरे, मार्ड संघटनेचे पदाधिकारी, सुरक्षा अधिकारी बी.डी. चिकाळकर यांच्यासह महाराष्ट्र सुरक्षा बलाचे सर्व सुरक्षा रक्षक उपस्थित होते.

रुग्णालयाच्या सुरक्षा समितीची प्रत्येक महिन्याला बैठक होत असते. मात्र अलीकडच्या काळात घडलेल्या काही वादग्रस्त घटना आणि सुरक्षारक्षकांकडून होणाऱ्या कथित अरेरावीच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर ही विशेष आढावा बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत वैद्यकीय अधीक्षक डॉ. राकेश जाधव यांनी उपस्थित सर्व सुरक्षारक्षकांना त्यांच्या दैनंदिन कर्तव्याची आणि जबाबदारीची जाणीव करून दिली. रुग्णालयाच्या आवारात गर्दी नियंत्रित करणे आणि शिस्त राखणे हे मुख्य काम असले तरी, ते करताना सुरक्षारक्षकांनी संयम बाळगणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. रुग्णालयात मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असली तरी प्रत्येक नातेवाईक हा आपल्या रुग्णाच्या काळजीमुळे आधीच तणावात असतो, त्यामुळे त्यांच्याशी विनाकारण वाद घालण्याऐवजी परिस्थिती शांततेत हाताळावी आणि कोणत्याही सुरक्षारक्षकाने कायदा स्वतःच्या हातात घेऊ नये, अशी स्पष्ट समज डॉ. जाधव यांनी दिली.

बैठकीच्या समारोपात अधिष्ठाता डॉ. शंकर धपाटे यांनी सर्व सुरक्षारक्षकांना अंतिम आणि कडक इशारा दिला. सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी आणि कर्मचाऱ्यांचे गुंडांसारखे गैरवर्तन यापुढे कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाही, असे डॉ. धपाटे यांनी ठणकावून सांगितले. सुरक्षारक्षकांनी केवळ एका जागेवर उभे न राहता रुग्णालयाच्या संवेदनशील विभागांमध्ये सातत्याने गस्त घालावी, अशा सूचना त्यांनी दिल्या. विशेषतः रात्रीच्या वेळी रुग्णालयाचा परिसर सुरक्षित ठेवण्यासाठी गस्त वाढवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. रुग्णालयाच्या आवारात सुरक्षारक्षकांनी आपापल्या निर्धारित जागेवरच ड्युटी करावी आणि रुग्णांना शक्य ती मदत करावी. सर्वांनी आपली कर्तव्ये व्यवस्थित पार पाडावी, कोणीही कायदा हातात घेऊ नये. यापुढे अनुचित घटनांची पुनरावृत्ती झाल्यास संबंधितांवर कोणतीही गय न करता थेट कठोर प्रशासकीय कारवाई केली जाईल, असा स्पष्ट संदेश त्यांनी दिला. यावेळी सुरक्षा रक्षकांना येणाऱ्या अडचणीही जाणून घेऊन त्यावर तोडग काढण्याच्या सूचना अधिष्ठाता डॉ. धपाटे यांनी दिल्या.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande