आरटीईचा ऑनलाइन सावळा गोंधळ, गटशिक्षणाधिकाऱ्यांना धरले धारेवर : फेरचौकशीची मागणी
अमरावती, 17 एप्रिल (हिं.स.) आरटीई निवडप्रक्रियेत गोंधळ झाला असून या प्रक्रियेची चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी वरुड तालुक्यातील पालकांनी पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे केली. त्याबाबत निवेदन देण्यात आले. शिक्षण
आरटीईचा ऑनलाइन सावळागोंधळ गटशिक्षणाधिकाऱ्यांना धरले धारेवर : फेरचौकशीची मागणी


अमरावती, 17 एप्रिल (हिं.स.)

आरटीई निवडप्रक्रियेत गोंधळ झाला असून या प्रक्रियेची चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी वरुड तालुक्यातील पालकांनी पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे केली. त्याबाबत निवेदन देण्यात आले. शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) होणाऱ्या प्रवेश प्रक्रियेत वरुड तालुक्यात मोठा गोंधळ समोर येत असल्याचे चित्र आहे. निवड झालेल्या पात्र विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेत पारदर्शकता नसल्याचा आरोप करीत वरुड तालुक्यातील संतप्त पालकांनी पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी यांना चांगलेच धारेवर धरत चौकशी करण्यासाठी निवेदन सादर केले आहे.

ज्या पालकांचे घर शाळेपासून एक किमी अंतराच्या आत आहे, अशा अनेक पालकांच्या पाल्यांची निवड रद्द करण्यात आली आहे. नियमांनुसार प्राधान्य मिळणे अपेक्षित असताना, स्थानिक पालकांना डावलले जात असल्याचे दिसून येत आहे, असा सवाल या निवेदनाद्वारे उपस्थित करण्यात आला आहे. आम्ही शाळेच्या जवळ राहतो, तरीही आमच्या मुलांना डावलले जात असेल आणि बोगस कागदपत्रे देणाऱ्यांना प्रवेश मिळत असेल, तर हा अन्याय आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होऊन आम्हाला अहवाल मिळावा, अशी मागणी संतप्त पालकांकडून करण्यात आली. तसेच, बोगस भाडेकरार म्हणजेच अनेक पालकांनी केवळ प्रवेशासाठी बनावट भाडेकरार किंवा चुकीचे गुगल लोकेशन दाखवून प्रवेश मिळविल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. खरोखर त्या पत्त्यावर ११ महिने वास्तव्यास आहेत का? त्यांच्या कागदपत्रांची आणि प्रत्यक्ष वास्तवाची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे यात पारदर्शकतेचा अभाव आढळून आल्याचे सांगत पाल्यांची निवड रद्द होणार का? याबाबतही स्पष्ट माहिती प्रशासनाकडून मिळत नसल्याने पालकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. याप्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता पालकांनी केवळ स्थानिक स्तरावरच नव्हे तर जिल्हा परिषद अमरावतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी, स्थानिक आमदार आणि थेट महाराष्ट्र राज्याच्या शिक्षणमंत्र्यांकडे या तक्रारीची प्रत पाठवली आहे. आता या तक्रारीनंतर शिक्षण विभाग काय पावले उचलतो आणि खरोखरच याप्रकरणाची चौकशी होते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याप्रसंगी शैलेश देशमुख, अनिल गावंडे, देवेंद्र लुंगे, विनोद सूर्यवंशी, मनीष धानोस्कर, रूपाली कासे, प्रफुल्ल काळके, प्रवीण गाडेवाल, सचिन घाटोळे यांच्यासह अन्य पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande