
रायगड, 17 एप्रिल (हिं.स.)। खालापूर पोलीस ठाणे हद्दीत नढाळ परिसरात अज्ञात चोरट्यांनी कंपनीच्या यार्डमध्ये घुसून लाखोंचे साहित्य लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे औद्योगिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
ही घटना 15 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 6 वाजल्यापासून ते 16 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंतच्या दरम्यान घडली. मिळालेल्या माहितीनुसार, नढाळ येथील SGB Brand Safeway Pvt. Ltd. या कंपनीच्या यार्डमध्ये अज्ञात आरोपींनी भिंतीला होल पाडून आत प्रवेश केला.
यानंतर चोरट्यांनी यार्डमध्ये ठेवलेले सुमारे ३,३६,५९५ रुपयांचे फॉर्मवर्क मटेरियल पॅनल चोरी करून नेले. हा प्रकार उघडकीस येताच कंपनी प्रशासनात खळबळ उडाली. या प्रकरणी खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 150/2026 नोंद करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 305(a), 331(3), 331(4) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नितीन सांगळे करीत असून अज्ञात आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आहेत. दरम्यान, परिसरात वाढत्या चोरीच्या घटनांमुळे सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)