बारदाना टंचाईमुळे हरभरा खरेदी केंद्रे ठप्प; शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी
अमरावती, 17 एप्रिल (हिं.स.) : राज्यातील तूर-हरभरा उत्पादक शेतकऱ्यांसमोर गंभीर संकट निर्माण झाले असून शासकीय खरेदी केंद्रे बारदाना (गोण्या) अभावी बंद पडल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय ओबीसी किसान महासंघाचे अध्यक
बारदाण्याअभावी ठप्प, शेतकऱ्यांची कोंडी प्रकाश साबळे यांची पणन मंत्र्यांकडे धाव


अमरावती, 17 एप्रिल (हिं.स.) : राज्यातील तूर-हरभरा उत्पादक शेतकऱ्यांसमोर गंभीर संकट निर्माण झाले असून शासकीय खरेदी केंद्रे बारदाना (गोण्या) अभावी बंद पडल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे.

या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय ओबीसी किसान महासंघाचे अध्यक्ष प्रकाश साबळे यांनी मुंबईत पणन मंत्री जयकुमार रावल यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या अडचणी मांडल्या. राज्यातील बंद पडलेली शासकीय खरेदी केंद्रे तातडीने, पुढील दोन दिवसांत सुरू करण्यात यावीत, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

शेतकऱ्यांचे उत्पादन बाजारात अडकून पडल्यामुळे त्यांना मोठा आर्थिक फटका बसत असल्याचे बैठकीत नमूद करण्यात आले. तसेच शासकीय धोरणे शेतकरीविरोधी ठरत असल्याचा आरोप करत पणन मंडळाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. यासंदर्भात मंत्र्यांकडे अधिकृत तक्रारही दाखल करण्यात आली असून दोषींवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, या प्रकरणाची गंभीर दखल घेत मंत्री जयकुमार रावल यांनी सकारात्मक भूमिका घेत राज्यातील कोणत्याही शासकीय खरेदी केंद्रावर बारदाना कमी पडू दिला जाणार नाही, अशी हमी दिली. तसेच संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

या निर्णयाकडे राज्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले असून लवकरात लवकर खरेदी प्रक्रिया सुरळीत होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

---------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande