यशोमती ठाकूर यांचा ट्रोलर्स आणि चुकीच्या प्रचारावर कडक इशारा; विकासावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन
अमरावती, 17 एप्रिल (हिं.स.) : माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी काँग्रेसमधील काही मोजक्या गटांवर तसेच भाजपशी संबंधित सोशल मीडिया ट्रोलर्सवर थेट निशाणा साधत जोरदार प्रतिक्रिया दिली आहे. राजकीय हेतूने चुकीची माहिती पसरवून आपली आणि सहकाऱ्यांची प्रतिमा
“अफवा पसरवणाऱ्यांना इशारा!” – यशोमती ठाकूर यांचा काँग्रेसमधील ‘गदार’ आणि भाजप ट्रोलर्सवर जोरदार हल्ला


अमरावती, 17 एप्रिल (हिं.स.) : माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी काँग्रेसमधील काही मोजक्या गटांवर तसेच भाजपशी संबंधित सोशल मीडिया ट्रोलर्सवर थेट निशाणा साधत जोरदार प्रतिक्रिया दिली आहे. राजकीय हेतूने चुकीची माहिती पसरवून आपली आणि सहकाऱ्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

यशोमती ठाकूर यांनी म्हटले आहे की, काही व्यक्ती आणि गट जाणीवपूर्वक अफवा पसरवत असून सोशल मीडियाच्या माध्यमातून चुकीचा प्रचार करून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, अशा नकारात्मक आणि दिशाभूल करणाऱ्या प्रचाराला बळी न पडण्याचे आवाहन त्यांनी नागरिकांना केले आहे.

त्या पुढे म्हणाल्या की, त्यांची राजकीय भूमिका नेहमीच स्पष्ट, ठाम आणि पारदर्शक राहिली आहे. “सत्य निर्भीडपणे मांडणे आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने काम करणे,” हीच आपली कार्यपद्धती असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कोणत्याही दबावाला किंवा अफवांना न जुमानता जनतेच्या हितासाठी काम करणे हेच आपले ध्येय असल्याचेही त्यांनी सांगितले.

जनतेशी असलेल्या नात्याचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, त्यांचा जनतेशी असलेला संपर्क आणि विश्वास हीच त्यांची खरी ताकद आहे. नागरिकांच्या समस्या आणि अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आपण कायम कटिबद्ध असल्याचे त्यांनी नमूद केले.

तसेच, अफवा, ट्रोलिंग आणि चुकीच्या प्रचारापासून सावध राहण्याचे आवाहन करत त्यांनी समाजात सकारात्मकता आणि विकासावर लक्ष केंद्रित करण्याची गरज अधोरेखित केली. “विकासाच्या मुद्द्यांवर एकत्र काम करणे आणि जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करणे हेच महत्त्वाचे आहे,” असे त्या म्हणाल्या.

या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले असून, काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद आणि भाजपशी सुरू असलेल्या राजकीय संघर्षाला नवीन दिशा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

--------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande