नंदुरबारमध्ये एकलव्य क्रीडा संकुलाचे लोकार्पण; पोलीस दलाच्या तंदुरुस्तीवर भर
नंदुरबार, 17 एप्रिल (हिं.स.) : महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागांतर्गत जिल्हा वार्षिक योजना 2025-26 मधून पोलीस मुख्यालय, नंदुरबार येथे उभारण्यात आलेल्या एकलव्य क्रीडा संकुलाच्या इमारतीचे नामकरण तसेच नव्याने तयार करण्यात आलेल्या बॅडमिंटन कोर्टाचे लोका
पालकमंत्री हसन मुश्रीफ


नंदुरबार, 17 एप्रिल (हिं.स.) : महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागांतर्गत जिल्हा वार्षिक योजना 2025-26 मधून पोलीस मुख्यालय, नंदुरबार येथे उभारण्यात आलेल्या एकलव्य क्रीडा संकुलाच्या इमारतीचे नामकरण तसेच नव्याने तयार करण्यात आलेल्या बॅडमिंटन कोर्टाचे लोकार्पण व उद्घाटन उत्साहात पार पडले.

हा कार्यक्रम राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी आमदार चंद्रकांत रघुवंशी, राजेश पाडवी, शिरीष नाईक, जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी, पोलीस अधीक्षक श्रवण दत्त, अपर पोलीस अधीक्षक आनंद कांबळे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अंकुश पालवे यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमात बोलताना पालकमंत्री मुश्रीफ यांनी सांगितले की, पोलीस दलाच्या दैनंदिन कामकाजासाठी शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्ती अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी अत्याधुनिक क्रीडा सुविधा उपलब्ध करून देणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

एकलव्य क्रीडा संकुलामुळे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना नियमित व्यायाम, क्रीडा सराव आणि स्पर्धात्मक वातावरण मिळणार असून त्यांच्या कार्यक्षमतेत वाढ होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तसेच नवीन बॅडमिंटन कोर्टामुळे क्रीडा संस्कृतीला चालना मिळेल आणि पोलीस दलात आरोग्यदायी जीवनशैली रुजण्यास मदत होईल, असेही त्यांनी सांगितले.

या वेळी मान्यवरांनी संकुलातील विविध सुविधांची पाहणी केली. या प्रकल्पामुळे पोलीस मुख्यालय परिसरात आधुनिक क्रीडा पायाभूत सुविधा निर्माण झाल्या असून, त्याचा लाभ भविष्यातील प्रशिक्षण व क्रीडा उपक्रमांनाही होणार आहे.

जिल्हा वार्षिक योजनेतून साकारलेला हा प्रकल्प नंदुरबार जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मान्यवरांनी यावेळी स्पष्ट केले.

-----------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande