
नाशिक, 17 एप्रिल (हिं.स.)। : शहरात अलीकडे घडलेल्या विविध घटनांमधून महिलांचे लैंगिक शोषण तसेच धर्मांतरणासारख्या प्रकारांचा पर्दाफाश झाला असून, या पार्श्वभूमीवर महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महिलांच्या सुरक्षिततेसाठी ठोस धोरण ठरविण्याच्या उद्देशाने शनिवार, (दि.१८) रोजी विभागीय आयुक्त कार्यालयाजवळील मित्रा संस्थेत महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीस आयटी कंपन्यांचे प्रमुख तसेच विविध उद्योजक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
भोंदू अशोक खरात प्रकरण तसेच कथित पत्रकार रविंद्र एरंडे प्रकरणातून महिलांच्या लैंगिक शोषणाचे अनेक प्रकार उघडकीस आले आहेत. या प्रकरणांचा तपास सुरू असतानाच काही बहुराष्ट्रीय आयटी कंपन्यांमध्ये ‘कॉर्पोरेट जिहाद’च्या नावाखाली धर्मांतरणासाठी तरुणींना मानसिक त्रास दिल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. त्यामुळे महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावर औद्योगिक व व्यावसायिक आस्थापना असून त्यामध्ये महिला कर्मचार्यांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे महिलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यासाठी आमदार प्रा. देवयानी फरांदे आणि आमदार सीमा हिरे यांनी पुढाकार घेत १३ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात प्राथमिक बैठक घेतली होती. या बैठकीत विविध उद्योजक संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा करून व्यापक जनजागृती मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याच अनुषंगाने आयोजित करण्यात आलेल्या शनिवारच्या बैठकीत महिला अत्याचार प्रकरणांवर ‘झिरो टॉलरन्स’ धोरण राबविणे, तसेच महिलांसाठी असलेल्या विविध कायद्यांची व्यापक जनजागृती करण्यावर भर दिला जाणार आहे. ‘प्रिव्हेन्शन ऑफ सेक्सुअल हरासमेंट अॅक्ट’ (पॉश)सह इतर कायद्यांबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या बैठकीस भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या अध्यक्षा चित्रा वाघ, नाशिक व मालेगावचे खासदार, आमदार, महापौर, औद्योगिक संघटनांचे पदाधिकारी, विविध शासकीय विभागांचे प्रमुख, आयटी क्षेत्रातील प्रतिनिधी तसेच खाजगी संस्थांचे अधिकारी उपस्थित राहणार असून सुमारे ३०० मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे.
पॉश अॅक्टविषयी प्रशिक्षण या बैठकी दरम्यान यशदा येथील पॉश अॅक्ट प्रशिक्षक व बाल न्याय मंडळाच्या सदस्या शोभा पवार या ‘पॉश अॅक्ट’ विषयावर प्रशिक्षण देणार आहेत. तसेच महिला व बालकल्याण विभागाचे सुनील देशाई ‘ई-बॉक्स’ पोर्टलविषयी माहिती देणार आहेत. महिला सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासन आणि समाज यांच्यात समन्वय साधून ठोस उपाययोजना राबविण्यासाठी ही बैठक महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV