
लातूर, 17 एप्रिल (हिं.स.)।
एकीकडे सूर्याचा पारा ४० अंशांच्या पार गेला असून अंगाची लाहीलाही होत आहे, तर दुसरीकडे याच रखरखत्या उन्हात बाजारपेठेत येणाऱ्या नागरिकांची तहान भागवण्यासाठी राधाकृष्ण बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेने मदतीचा हात पुढे केला आहे. शहराच्या मुख्य बाजारपेठेत दरवर्षीप्रमाणे यंदाही मोफत थंड 'बिसलेरी' पाणपोईचा शुभारंभ करण्यात आला असून, या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
शहरातील मेन रोडवरील राधाकृष्ण कृषी सेवा केंद्रासमोर या पाणपोईचे उद्घाटन संस्थाचालक आकाश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. बासिदखान पठाण होते.
आरोग्याची काळजी; मिळणार शुद्ध 'बिसलेरी' पाणी
साधारणपणे सार्वजनिक पाणपोईवर साध्या पाण्याची सोय असते, मात्र राधाकृष्ण संस्थेने नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून संपूर्ण उन्हाळाभर शुद्ध आणि थंड 'बिसलेरी' पाणी मोफत देण्याचा संकल्प केला आहे.
नागरिकांना उन्हाळ्यात शुद्ध आणि थंड पाणी मिळावे, हाच आमचा मुख्य उद्देश आहे. सामाजिक बांधिलकीतून आम्ही हा छोटासा प्रयत्न करत आहोत.
— शिवाजीराव पाटील (अध्यक्ष, राधाकृष्ण बहुउद्देशीय सेवाभावी संस्था)
अहमदपूरचा मेन रोड ही मुख्य बाजारपेठ असल्याने येथे ग्रामीण भागातील नागरिक, वयोवृद्ध आणि लहान मुलांची मोठी वर्दळ असते. कडक उन्हात पिण्याच्या पाण्यासाठी होणारी वणवण थांबवण्यासाठी शिवाजीराव पाटील यांनी उपलब्ध करून दिलेल्या या सुविधेमुळे प्रवाशांना आणि व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
संस्थेच्या या संवेदनशील उपक्रमामुळे परिसरातून 'राधाकृष्ण' टीमवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis