
अमरावती, 17 एप्रिल (हिं.स.)।
राज्यात सन २०२५-२६ पासून नवीन शैक्षणिक अभ्यासक्रमाची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने सुरू असून, त्यानुसार इयत्ता दुसरी, तिसरी आणि चौथीला शिकविणाऱ्या शिक्षकांसाठी विशेष प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. मात्र हे प्रशिक्षण उन्हाळी सुटीतच घेतले जाणार असल्याने शिक्षकांच्या सुटीवर गंडातर आल्याची चर्चा शिक्षण क्षेत्रात सुरू झाली आहे.शैक्षणिक वर्ष १५ जून २०२६ पासून सुरू होणार असल्यामुळे त्यापूर्वी सर्व शिक्षकांचे प्रशिक्षण पूर्ण करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यानुसार राज्यस्तर, जिल्हास्तर आणि तालुकास्तर अशा तीन टप्प्यांत प्रशिक्षणाचे नियोजन करण्यात आले आहे. मराठी व अन्य माध्यमांसाठी तीन स्तरांवर प्रशिक्षण होणार असून, उर्दू माध्यमासाठी राज्य व जिल्हास्तरावरच प्रशिक्षण दिले जाईल.प्रशिक्षण कालावधीत इयत्ता दुसरीसाठी ३ दिवस, तर तिसरी व चौथीसाठी ४ दिवसांचे सत्र निश्चित करण्यात आले आहे. राज्यस्तर प्रशिक्षण ४ ते ७ मे, जिल्हास्तर ११ ते १४ मे आणि तालुकास्तर १८ ते ३० मे दरम्यान पार पडणार आहे. उर्दू माध्यमासाठीही साधारण त्याच कालावधीत प्रशिक्षण आयोजित केले जाणार आहे.प्रशिक्षणासाठी आवश्यक अभ्यासक्रम साहित्य शाळांपर्यंत पोहोचविण्यात येणार असून, प्रशिक्षणार्थींना ते सोबत आणणे बंधनकारक राहील. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (DIET) यांच्यावर प्रशिक्षण आयोजनाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. प्रत्येक ६० शिक्षकांचा एक गट तयार करून प्रशिक्षण दिले जाणार आहे.दरम्यान, शिक्षकांना जनगणना, मतदार नोंदणीसारखी शासकीय कामेही सोपविण्यात येत असल्याने प्रशिक्षणाचे नियोजन टप्प्याटप्प्याने करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सर्व शिक्षकांनी वेळेत प्रशिक्षण पूर्ण करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी