
जळगाव, 17 एप्रिल (हिं.स.) : भुसावळ नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा गायत्री चेतन भंगाळे यांनी राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नी रजनी सावकारे यांच्याविरोधात गंभीर आरोप करत पोलीस अधीक्षकांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.
नगराध्यक्षा भंगाळे यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या जात पडताळणी प्रक्रियेत अडथळा आणण्याच्या उद्देशाने बनावट कागदपत्रे सादर करण्यात आली. ही कागदपत्रे उत्तर प्रदेशातील महोबा जिल्ह्यातील फत्तेपूर बजेरिया येथून प्राप्त झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
सध्या गायत्री भंगाळे यांच्या जात वैधता प्रमाणपत्राचा दावा जळगाव येथील जात पडताळणी समितीकडे प्रलंबित आहे. याच दरम्यान निवडणुकीत त्यांच्या विरोधात उभ्या असलेल्या रजनी सावकारे यांनी काही कागदपत्रे सादर करून त्यांच्या दाव्यावर आक्षेप घेतल्याचेही समोर आले आहे.
मात्र, समितीच्या तपासात संबंधित कागदपत्रांतील जमीन आणि मालमत्ता ही भंगाळे किंवा त्यांच्या नातेवाईकांच्या नावावर नसल्याचा दावा नगराध्यक्षा भंगाळे यांनी केला आहे. त्यामुळे या कागदपत्रांच्या सत्यतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
तक्रारीत ‘कामता प्रसाद नारायण’ या नावाचा विशेष उल्लेख असून, त्या व्यक्तीचा भंगाळे कुटुंबाशी कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. नावातील साधर्म्याचा गैरवापर करून चुकीची माहिती सादर केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
या प्रकरणात जाणीवपूर्वक फसवणूक व कटकारस्थान रचल्याचा आरोप करत संबंधितांवर भारतीय न्याय संहितेच्या कलम 420 आणि 120 (ब) अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच सखोल चौकशी करून अटक करण्याची मागणीही तक्रारीत करण्यात आली आहे.
---------------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर