
कोल्हापूर, 17 एप्रिल (हिं.स.) : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून येत्या १ जूनपासून राज्यातील सर्व बसस्थानकांवरील शौचालय सुविधा प्रवाशांसाठी पूर्णपणे मोफत उपलब्ध करून दिली जाणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली.
कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानकाच्या पाहणी दौऱ्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी बसस्थानकातील स्वच्छता गृह, उपाहारगृह, हिरकणी कक्ष आणि प्रवासी कक्षांची सविस्तर पाहणी केली तसेच प्रवाशांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
मंत्री सरनाईक यांनी सांगितले की, प्रवाशांकडून बस भाड्यातून आधीच स्वच्छता कर वसूल केला जातो. त्यामुळे हा निधी महामंडळ स्वतः खर्च करून बसस्थानकांवरील शौचालय व्यवस्था पूर्णपणे मोफत केली जाणार आहे. तसेच खासगी कंत्राटदारांमार्फत चालवली जाणारी शौचालय व्यवस्था बंद करून त्याची जबाबदारी महामंडळ स्वतः घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पाहणीदरम्यान प्रवाशांकडून अवाजवी शुल्क आकारले जात असल्याच्या तक्रारींची गंभीर दखल घेत त्यांनी प्रशासनाला दर चार तासांनी स्वच्छता करणे अनिवार्य करण्याचे निर्देश दिले. बसस्थानक परिसर आणि स्वच्छता गृहांची नियमित स्वच्छता कायम ठेवण्यावर त्यांनी भर दिला.
बसस्थानकावरील उपाहारगृहात गरजू प्रवाशांसाठी ३० रुपयांत चहा आणि नाश्ता देण्याची योजना प्रत्यक्षात अंमलात न आल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ही योजना २४ तासांत पूर्ववत करून त्याबाबत स्पष्ट फलक दर्शनी भागात लावण्याचे आदेश त्यांनी दिले, अन्यथा संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला.
प्रवाशांना दर्जेदार सेवा देताना कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही, असे सांगत मंत्री सरनाईक यांनी स्थानकांवरील मूलभूत सुविधांचा दर्जा सुधारण्यावर शासनाचा विशेष भर असल्याचेही अधोरेखित केले.
या पाहणी दौऱ्यावेळी राज्य परिवहन महामंडळाच्या (पुणे प्रदेश) प्रादेशिक व्यवस्थापक अमृता ताम्हणकर, विभागीय वाहतूक अधिकारी अनिल मेहतर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
----------------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar