
परभणी, 17 एप्रिल (हिं.स.)।
झरी महसूल मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेले ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ झरी येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.
नागरिकांना विविध शासकीय सेवा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित या शिबिराला पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने प्रतिसाद दिला.
अभियानाचे उद्घाटन जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या हस्ते झाले. यावेळी उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले, तहसीलदार संदीप राजपुरे, नायब तहसीलदार राजकुमार राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच झरी जिल्हा परिषद सर्कलचे सदस्य दिलीपराव देशमुख, पंचायत समिती सदस्य प्रमोद गायकवाड, कृषिभूषण कांतराव देशमुख आणि एसबीआय बँकेचे व्यवस्थापक दिनेश कुमार झा हे मान्यवर उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी श्री. चव्हाण यांनी बालविवाह कुप्रथा, सामाजिक भेदभाव, शेत रस्ते अडवणूक प्रवृत्ती, समाजातील भेदभाव, एक गाव एक स्मशानभूमी, अंधश्रद्धा निर्मूलन करण्याची गरज इत्यादी विषयांवर स्पष्ट मत व्यक्त केले. तसेच शेती पद्धतीसह वर्तमान समाजाचे चित्र व त्यात आवश्यक असणाऱ्या सुधारणा यावर सविस्तर भाष्य केले.
या समाधान शिबिरामध्ये पंचायत समिती, तालुका कृषी अधिकारी कार्यालय, उपअधीक्षक भूमी अभिलेख, आरोग्य विभाग, पशुसंवर्धन विभाग, दुय्यम निबंधक कार्यालय, एकात्मिक बाल विकास सेवा, महिला व बाल विकास विभाग, महाराष्ट्र ग्रामीण जीवन्नोती अभियान, ॲग्री स्टॅक योजना, ई-सेवा केंद्र, पुरवठा विभाग, आधार नोंदणी यांसह एकूण 16 विविध विभागांचे स्वतंत्र डेस्क उभारण्यात आले होते. त्यामुळे नागरिकांना विविध योजनांची माहिती व सेवा एका ठिकाणी सहज उपलब्ध झाली.
शिबिरादरम्यान जिल्हाधिकारी यांच्या हस्ते लाभार्थ्यांना प्रतिनिधिक स्वरूपात प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. यामध्ये निराधार व दिव्यांग महिलांना सामाजिक अर्थसहाय्य योजनांचा लाभ देण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांना आवश्यक असलेली जात व उत्पन्न प्रमाणपत्रे, मोहिमेअंतर्गत फेरफार नक्कल व दुरुस्त सातबारा उतारे वितरित करण्यात आले.
आरोग्य विभागामार्फत नागरिकांची प्राथमिक आरोग्य तपासणी करण्यात आली, तर विविध योजनांसाठी इच्छुक नागरिकांकडून अर्जही स्वीकारण्यात आले. झरीसह साडेगाव, वाडीदमई, संबर, मटकराळा आदी गावांतील ग्रामस्थांनी शिबिरात मोठ्या संख्येने उपस्थित राहून विविध योजनांचा लाभ घेतला.
या शिबिरामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना शासकीय सेवांचा थेट लाभ मिळाल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis