
अमरावती, 17 एप्रिल (हिं.स.) : राज्यभर वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर इयत्ता चौथी व सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या वेळापत्रकावरून वाद निर्माण झाला असून महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने परीक्षा सकाळच्या सत्रात घेण्याची ठाम मागणी केली आहे.
परीक्षा परिषद, पुणे यांच्या नियोजनानुसार 26 एप्रिल रोजी पहिला पेपर सकाळी 11 ते 12.30 आणि दुसरा पेपर दुपारी 2 ते 3.30 या वेळेत होणार आहे. मात्र सध्या राज्यात उष्णतेची तीव्र लाट सुरू असल्याने दुपारच्या वेळेत परीक्षा घेणे विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते, असा इशारा शिक्षक समितीने दिला आहे.
विशेषतः ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांमध्ये टिनाच्या पत्र्यांच्या वर्गखोल्या, पंख्यांचा अभाव तसेच वीजपुरवठ्याच्या समस्या असल्याने विद्यार्थ्यांना दुपारच्या उन्हात परीक्षा देताना उष्माघाताचा धोका निर्माण होऊ शकतो. पाणीटंचाईमुळे परिस्थिती आणखी गंभीर बनत असल्याचेही समितीने नमूद केले आहे.
या पार्श्वभूमीवर शिक्षक समितीने पर्यायी वेळापत्रक सुचवले असून त्यानुसार पहिला पेपर सकाळी 8.30 ते 10 आणि दुसरा पेपर 10.30 ते 12 या वेळेत घेण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना उष्णतेपासून दिलासा मिळेल आणि त्यांच्या कामगिरीतही सुधारणा होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
या मागणीला पालक, शिक्षक आणि विविध संघटनांकडून पाठिंबा मिळत असून विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून तातडीने निर्णय घ्यावा, अशी विनंती करण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य प्रसिद्धी प्रमुख राजेश सावरकर यांनी याबाबत माहिती देत परीक्षा परिषदेकडून सकारात्मक निर्णयाची अपेक्षा व्यक्त केली आहे.
------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी