
परभणी, 17 एप्रिल (हिं.स.)।
शहरातील रायगड कॉर्नर परिसरात पहाटेच्या सुमारास अवैधरित्या गोवंश जनावरांची वाहतूक करणार्या वाहनांवर पोलिसांनी कारवाई करत मोठा साठा जप्त केला आहे. या प्रकरणी संबंधित चालक व आरोपींविरोधात सेलू पोलीस ठाण्यात तीन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सात पिकअप व एक आयशर अशा एकूण आठ वाहनांमधून गोवंश जनावरे अवैधरित्या वाहतूक केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार रायगड कॉर्नर येथे सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान सुमारे 45 बैल जातीची गोवंश जनावरे जप्त करण्यात आली असून त्यांची किंमत व जप्त केलेल्या वाहनांसह एकूण सुमारे 55 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही जनावरे पारडगाव (ता. परतूर) येथून कोंबून, त्यांना यातना होईल अशा अमानुष पद्धतीने वाहतूक केली जात असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. यामुळे मोटार वाहन कायदा व प्राणी संरक्षण संबंधित कायद्यांचे उल्लंघन झाल्याने गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. जप्त करण्यात आलेली सर्व गोवंश जनावरे इटोली (ता. जिंतूर) येथील गोशाळेत हलविण्यात आली आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis