
तेहरान, 18 एप्रिल (हिं.स.) : इराण आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या चर्चांच्या प्रयत्नांदरम्यान दोन्ही देशांतील तणाव अधिकच वाढताना दिसत आहे. इराणच्या संसद अध्यक्ष मोहम्मद बागेर गालिबाफ यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना कठोर इशारा देत, अमेरिकेने नौदल नाकेबंदी सुरू ठेवल्यास होर्मुझ सामुद्रधुनी बंद केली जाईल, असे स्पष्ट केले आहे.
गालिबाफ यांनी 'एक्स' (X) वरील पोस्टमध्ये म्हटले की, होर्मुझ सामुद्रधुनीतून होणारी वाहतूक पूर्णपणे इराणी अधिकाऱ्यांच्या परवानगीवर अवलंबून असेल. “नाकेबंदी कायम राहिल्यास होर्मुझ सामुद्रधुनी खुली राहणार नाही,” असे त्यांनी ठामपणे सांगितले. तसेच त्यांनी ट्रम्प यांच्यावर एका तासात सात खोटे दावे केल्याचा आरोपही केला.
यापूर्वी इराणने युद्धविरामाच्या पार्श्वभूमीवर होर्मुझ सामुद्रधुनी सर्व व्यापारी जहाजांसाठी खुली करण्याची घोषणा केली होती. मात्र, त्यानंतर लगेचच गालिबाफ यांच्या या वक्तव्यामुळे परिस्थिती पुन्हा तणावपूर्ण झाली आहे.
इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनीही सांगितले की, लेबनॉनमधील युद्धविरामाच्या अनुषंगाने आणि समन्वयित मार्गांनुसार सामुद्रधुनी खुली करण्यात आली होती.
दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत करार होईपर्यंत नाकेबंदी कायम राहील, असे स्पष्ट केले आहे. त्यांनी इशाराही दिला की, करार न झाल्यास अमेरिका पुन्हा हवाई हल्ले सुरू करू शकते.
होर्मुझ सामुद्रधुनी हा जगातील अत्यंत महत्त्वाचा जलमार्ग मानला जातो, ज्यातून जागतिक तेलपुरवठ्याचा मोठा हिस्सा वाहतो. त्यामुळे या भागातील कोणताही तणाव जागतिक ऊर्जा बाजारावर गंभीर परिणाम करू शकतो.
-----------------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे