
वॉशिंग्टन, 18 एप्रिल (हिं.स.) : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला पुन्हा एकदा धमकी दिली आहे. शस्त्रसंधी पुढे वाढवता येणार नाही आणि करार अयशस्वी झाल्यास लष्करी कारवाई केली जाऊ शकते, असे ते म्हणाले.
बुधवारपर्यंत दीर्घकालीन करार झाल्याशिवाय इराणसोबतची शस्त्रसंधी वाढवली जाणार नाही, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. इराणच्या बंदरांची नाकेबंदी सुरू ठेवणे आणि पुन्हा बॉम्बहल्ला करण्याची शक्यता यांसारख्या दबावतंत्राचा विचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. यासंदर्भात बोलताना ट्रम्प म्हणाले, मी कदाचित शस्त्रसंधी वाढवणार नाही, पण नाकेबंदी सुरूच राहील. त्यामुळे नाकेबंदी आहे आणि दुर्दैवाने, आम्हाला पुन्हा बॉम्बहल्ला सुरू करावा लागेल.
इराणचे संसद अध्यक्ष मोहम्मद बागेर गालिबाफ यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना इशारा दिला आहे की, जर अमेरिकेने नौदल नाकेबंदी सुरू ठेवली, तर तेहरान होर्मुझची सामुद्रधुनी बंद करेल.अमेरिकेच्या अध्यक्षांनी नाकेबंदी पूर्ण ताकदीने सुरू राहील असे म्हटल्यानंतर लगेचच हा इशारा देण्यात आला आहे. इराणने यापूर्वी म्हटले होते की, युद्धविरामाच्या उर्वरित कालावधीसाठी होर्मुझची सामुद्रधुनी सर्व व्यापारी जहाजांसाठी पूर्णपणे खुली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे