
लातूर, 02 एप्रिल (हिं.स.)।: भारतीय टपाल विभागामार्फत नागरिकांना अधिक वेगवान, सुलभ आणि त्यांच्या निवासस्थानाच्या जवळ टपाल सेवा उपलब्ध करून देण्यासाठी “फ्रँचायझी 2.0” ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून स्थानिक उद्योजक, दुकानदार आणि इच्छुक व्यक्तींना विभागाचे अधिकृत फ्रँचायझी भागीदार म्हणून काम करण्याची संधी मिळणार असून, टपाल सेवा समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यावर विशेष भर देण्यात येत आहे.
फ्रँचायझी धारकांना स्पीड पोस्ट, नोंदणीकृत टपाल, पार्सल बुकिंग आणि टपाल वितरण यांसारख्या सेवा पुरविता येतील. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जलद व कार्यक्षम सेवा देण्यासोबतच, या योजनेमुळे स्थानिक युवकांसाठी स्वयंरोजगाराच्या नवीन संधी निर्माण होणार आहेत. विशेषतः ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये टपाल सेवेचा विस्तार करणे आणि विभागाच्या देखरेखीखाली एक विश्वसनीय यंत्रणा उभी करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
ज्या इच्छुक नागरिकांकडे आवश्यक जागा, मूलभूत सोयी-सुविधा आणि निर्धारित पात्रता आहे, ते या योजनेसाठी अर्ज करू शकतात. “फ्रँचायझी 2.0” योजना ही टपाल सेवांचा विस्तार, डिजिटल सक्षमीकरण आणि रोजगारनिर्मिती यांचा एक प्रभावी संगम आहे. या योजनेमुळे टपाल सेवा अधिक लोकाभिमुख आणि परिणामकारक होणार असून, जास्तीत जास्त इच्छुकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन लातूर विभागाचे डाकघर अधीक्षक आर. एस. बोटलावार यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी इच्छुकांनी आपल्या जवळच्या मुख्य टपाल कार्यालयाशी किंवा विभागीय कार्यालयाशी संपर्क साधावा.
--------------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis