
सोलापूर, 02 एप्रिल (हिं.स.)। सोलापूर शहरात बीपीसीएल, आयओसीएल व एचपीसीएल या तीन गॅस कंपनीच्या एकूण २० गॅस एजन्सी कार्यरत आहेत. यातील सात गॅस एजन्सी समोर नागरिक ई केवायसी साठी तसेच गॅस सिलेंडर साठी मोठ्या प्रमाणावर गर्दी करत असल्याचे निर्देशनास आले आहे. तरी नागरिकांनी घरी बसून क्यू आर कोडच्या माध्यमातून ई केवायसी करावे व तर गॅस कंपन्यांनी गर्दी होणाऱ्या गॅस एजन्सींना वाढीव गॅस सिलेंडर पुरवठा करून त्या एजन्सीनी गॅस सिलेंडरचा पुरवठा घरपोच करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले. नियोजन भवन येथील सभागृहात गॅस पुरवठा करणाऱ्या कंपन्यांच्या तसेच गर्दी होणारा शहरातील सात गॅस एजन्सी प्रतिनिधी यांच्या समवेत आयोजित बैठकीत जिल्हाधिकारी आशीर्वाद मार्गदर्शन करत होते. यावेळी अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे, गॅस कंपनीचे जिल्हा समन्वयक श्री. रघुकुमार, एचपीसीएलचे सागर चव्हाण व आयओसीएलचे सागर गौतम यांच्यासह गॅस एजन्सी चे प्रतिनिधी उपस्थित होते. जिल्हाधिकारी आशीर्वाद म्हणाले की, जिल्ह्यातील गॅस एजन्सी समोर गर्दी होऊ नये यासाठी प्रशासनाने २३ मार्च रोजी स्पष्ट आदेश दिले आहेत. तरी सोलापूर शहरातील काही ठिकाणी गॅस एजन्सी समोर सिलेंडर साठी रांगा लागत आहेत. तसेच एजन्सीच्या म्हणण्याप्रमाणे ई केवायसी साठी नागरिक मोठ्या प्रमाणावर येत असल्याने ई केवायसी साठी प्रशासनाच्या वतीने क्यूआर कोड उपलब्ध करून देण्यात येत आहे. नागरिकांनी घरी बसूनच ऑनलाइन ई-केवायसी करण्याचे आवाहन त्यांनी केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड