
तिरुवनंतपुरम, 02 एप्रिल (हिं.स.)।देशात इंधन किंवा गॅसची कोणतीही कमतरता नसून भारत कोणत्याही ऊर्जा संकटाला सामोरे जाण्यास पूर्णपणे सक्षम असल्याचा विश्वास केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला. ते गुरुवारी केरळ राज्यात प्रचार सभेत बोलत होते.
केरळमधील सभेत बोलताना संरक्षण मंत्री म्हणाले की, भारतीय नौदल होर्मुज सामुद्रधुनीतून भारतीय तेल टँकर सुरक्षितपणे परत आणत आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी भारताच्या हितांचे संरक्षण करण्यासाठी आपल्या कूटनीतिक कौशल्याचा प्रभावी वापर करत असल्याचे त्यांनी सांगितले. राजनाथ सिंह म्हणाले, “आज आपण सर्वजण मोठ्या बदलांच्या काळातून जात आहोत. पश्चिम आशियामध्ये मोठा संघर्ष सुरू आहे. केरळमधील अनेक नागरिक त्या देशांमध्ये राहतात आणि काम करतात. मात्र, कोणत्याही प्रकारची चिंता करण्याचे कारण नाही, कारण भारतीय नागरिकांच्या सुरक्षा आणि संरक्षणासाठी आम्ही कोणतीही पावले उचलण्यास मागे हटणार नाही. त्यासाठी आम्ही पूर्णपणे तयार आहोत.”
ते पुढे म्हणाले, “पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर काही लोक खोट्या अफवा पसरवून तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. देशात ना पेट्रोल-डिझेलची कमतरता आहे, ना गॅसची. भारत कोणत्याही संकटाचा सामना करण्यास सक्षम आहे. आमचे नौदल होर्मुज सामुद्रधुनीतून भारतीय टँकर सुरक्षितपणे बाहेर काढत आहे. मात्र, अशा संकटकाळात देशासोबत उभे राहण्याऐवजी विरोधक खालच्या पातळीचे राजकारण करत आहेत.”
राजनाथ सिंह म्हणाले, “मी देशाचा गृहमंत्री म्हणूनही काम केले आहे आणि आज संरक्षण मंत्री म्हणून देशाची सेवा करत आहे. गेल्या ११ वर्षांत अंतर्गत सुरक्षेपासून ते बाह्य शत्रूंविरुद्धच्या सुरक्षेपर्यंत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने राष्ट्रीय सुरक्षेला बळकटी दिली आहे. अलीकडेच पार पडलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान हा बदल संपूर्ण जगाने पाहिला.”
ते पुढे म्हणाले, “काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारच्या काळातील परिस्थिती आठवा — वारंवार दहशतवादी घटना घडत असत. मात्र, केंद्रात मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार आल्यानंतर दहशतवादी घटनांवर केवळ आळा बसला नाही, तर दहशतवादाविरुद्ध निर्णायक पावलेही उचलण्यात आली आहेत.” पश्चिम आशियातील परिस्थितीबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, भारत तेथील घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहे आणि कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी देश पूर्णपणे तयार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode