कागलमध्ये शासकीय योजनांच्या ३४५ लाभार्थ्यांना मंजुरीपत्राचे वाटप
कोल्हापूर, 20 एप्रिल (हिं.स.)।संजय गांधी निराधार योजनेसह इतर योजनांच्या माध्यमातून निराधारांना आधार देण्याचे काम मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले आहे, असे गौरवोद्गार माजी आमदार संजयबाबा घाटगे व शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजीतसिंह घाटगे यांनी काढले.सं
कागलमधील ३४५ लाभार्थ्यांना मंजुरीपत्राचे वितरण


कोल्हापूर, 20 एप्रिल (हिं.स.)।संजय गांधी निराधार योजनेसह इतर योजनांच्या माध्यमातून निराधारांना आधार देण्याचे काम मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले आहे, असे गौरवोद्गार माजी आमदार संजयबाबा घाटगे व शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजीतसिंह घाटगे यांनी काढले.संजय गांधी निराधार योजनेच्या नव्याने मंजूर झालेल्या ३४५ लाभार्थ्यांना मंजुरीपत्राचे वितरण कागलमधील बहुउद्देशीय कार्यालयात करण्यात आले. यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची प्रमुख उपस्थिती होती.

माजी आमदार संजयबाबा घाटगे म्हणाले, संजय गांधी निराधार योजना ज्यावेळी सुरू झाली, त्यावेळी या योजनेची खिल्ली उडवण्यात आली. ही योजना कशी काय लोकांपर्यंत पोहोचणार, असे प्रश्न उपस्थित केले गेले. मात्र; हसन मुश्रीफ यांच्याकडे हे खाते आल्यानंतर त्यांनी ही योजना प्रत्येकाच्या घराघरात व झोपडपट्टीपर्यंत पोहोचवण्याचे काम केले. त्यांनी या योजनेचा वापर गोरगरीब लाभार्थ्यांचे कल्याण करण्यासाठीच केला.

शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजीतसिंह घाटगे म्हणाले, आपण व मंत्री हसन मुश्रीफ यांनी एकमेकाविरोधात निवडणुका लढवल्या. मात्र; ही योजना मंत्री श्री. मुश्रीफ यांनीच आणली हे मान्य करावेच लागेल. राज्यात सर्वात जास्त लाभार्थी कागल तालुक्यातील आहेत. या योजनेसाठी उत्पन्नाची अट 21 हजार वरून 50 हजार रुपये करण्याची गरज आहे. त्यासाठी आम्ही तिघेजण प्रयत्न करू.

वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, मी मंत्रिमंडळात काम करत असताना घेतलेल्या प्रत्येक निर्णयामध्ये गरीब आणि सामान्य माणसाचे हित कसे होईल हेच पाहिले. विविध योजना गोरगरिबांच्या घरापर्यंत पोहोचवण्याचे काम कार्यकर्त्यांनी व या समितीने केले आहे. या योजनेमुळे राज्यभर माझे नाव श्रावणबाळ म्हणून पडले. वयोवृद्ध, अंध, अपंग यांच्यासाठी विविध योजना आपण आणल्या. महायुती सरकारने दिव्यांगांची पंधराशे रुपये पेन्शन आता अडीच हजार रुपये केली आहे. संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना दोन हजार रुपये पेन्शन करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. ते म्हणाले, या योजनेसाठी उत्पन्नाची अट पन्नास हजार रुपये करणे व वयाची अट ६५ वरून ६० वर्षे करणे यासाठी आम्ही तिघेजण पाठपुरावा करू.

कार्यक्रमास प्रांताधिकारी प्रसाद चौगुले, तहसीलदार अमरदीप वाकडे, जिल्हा बँकेचे संचालक भैया माने, गोकुळचे संचालक युवराज पाटील, जनार्दन पाटील, बाबासो सांगले, भूषण पाटील , चंद्रकांत गवळी, प्रवीण काळबर, सतीश घाडगे, प्रवीण भोसले, अस्लम मुजावर, नवाज मुश्रीफ, संजय चितारी, अरुण गुरव, नवल बोते यांच्यासह कागलचे नगरसेवक, नगरसेविका, कार्यकर्ते व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्वागत संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष सौरभ पाटील यांनी केले. प्रास्ताविक केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने यांनी केले. आभार सदस्य सौ. पूजा मोरे यांनी मानले.

---------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande