हेल्मेट, एक आयुष्य – लातूर पोलिसांचा अभिनव उपक्रम
लातूर, 20 एप्रिल (हिं.स.)। : वाढत्या रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर लातूर जिल्हा पोलीस दलाने सुरक्षिततेसाठी पुढाकार घेत “एक हेल्मेट, एक आयुष्य” हा उपक्रम राबवला आहे. लातूर जिल्हा पोलीस अधिकारी व कर्मचारी सहकारी पतसंस्था यांच्या वतीने पोलीस सभासद
अभिनव उपक्रम


लातूर, 20 एप्रिल (हिं.स.)।

: वाढत्या रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर लातूर जिल्हा पोलीस दलाने सुरक्षिततेसाठी पुढाकार घेत “एक हेल्मेट, एक आयुष्य” हा उपक्रम राबवला आहे. लातूर जिल्हा पोलीस अधिकारी व कर्मचारी सहकारी पतसंस्था यांच्या वतीने पोलीस सभासदांना मोफत आयएसआय प्रमाणित हेल्मेटचे वाटप करण्यात आले.

पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या हस्ते सोमवार, 20 एप्रिल रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयात या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. पहिल्या टप्प्यात 50 पोलीस कर्मचारी व सभासदांना हेल्मेटचे वाटप करण्यात आले असून, पुढील काळात सुमारे दीड हजार पोलिसांना मोफत हेल्मेट देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. यावेळी अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण उपस्थित होते.

या प्रसंगी बोलताना अमोल तांबे यांनी सांगितले की, रस्ते अपघातांमधील सुमारे 80 टक्के मृत्यू हे हेल्मेट न वापरल्यामुळे होतात. “हेल्मेट हे केवळ दंड टाळण्यासाठी नव्हे, तर जीव वाचविण्यासाठी अत्यावश्यक आहे. अपघाताच्या वेळी डोक्याचे संरक्षण करून गंभीर दुखापती टाळण्यात हेल्मेट महत्त्वाची भूमिका बजावते,” असे त्यांनी स्पष्ट केले.

पोलीस दल दिवस-रात्र समाजाच्या सुरक्षेसाठी कार्यरत असताना, अनेकदा स्वतःच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. या पार्श्वभूमीवर पोलीस दलाने स्वतःपासून सुरुवात करून सुरक्षिततेचा आदर्श निर्माण करण्याचा निर्धार केला आहे.

कार्यक्रमाला पतसंस्थेचे अध्यक्ष परमेश्वर ढेकणे, सचिव नामदेव सारोळे यांच्यासह अन्य पदाधिकारी व मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते. या उपक्रमाद्वारे केवळ पोलीस कर्मचारीच नव्हे, तर सर्वसामान्य नागरिकांमध्येही रस्ते सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande