बंटी-बबली’ची घरफोडी उघड; अमरावतीत १२.३० लाखांचा मुद्देमाल जप्त
अमरावती, 20 एप्रिल (हिं.स.) गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या घरफोडी प्रकरणाचा छडा लावत डी.बी. पथकाने पती-पत्नी आरोपींना अटक करून तब्बल १२ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. घरात काम करणाऱ्या नोकरानेच मालकाच्या विश्वासाला तडा
बंटी-बबली’ची घरफोडी उघड; गाडगेनगर पोलिसांची धडाकेबाज कारवाई, १२.३० लाखांचा मुद्देमाल जप्त


अमरावती, 20 एप्रिल (हिं.स.)

गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या घरफोडी प्रकरणाचा छडा लावत डी.बी. पथकाने पती-पत्नी आरोपींना अटक करून तब्बल १२ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. घरात काम करणाऱ्या नोकरानेच मालकाच्या विश्वासाला तडा देत पत्नीच्या मदतीने चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.या प्रकरणी फिर्यादी श्रवण पवन गट्टाणी (वय ३२, रा. केशव कॉलनी, विद्या भारती रोड, अमरावती) यांनी ७ एप्रिल ते १४ एप्रिल २०२६ दरम्यान घरातून ७ लाख रुपये रोख रक्कम व सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची तक्रार गाडगेनगर पोलीस ठाण्यात दाखल केली होती. या तक्रारीवरून पोलिसांनी संशयित नोकर प्रविण पंजाबराव पवार (वय ३५, रा. नांदरूण, ता. दर्यापूर) व त्याची पत्नी पुनम प्रविण पवार (वय २१) यांच्या विरोधात गुन्हा नोंदवून तपास सुरू केला.तपासादरम्यान डी.बी. पथकाने दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्यांनी चोरीची कबुली दिली. त्यानंतर आरोपी प्रविण पवार याला अटक करून पोलीस कोठडी (पीसीआर) मिळवण्यात आली. कोठडीदरम्यान आरोपीकडून चोरीतील मुद्देमालाचा मोठा हिस्सा जप्त करण्यात पोलिसांना यश आले.जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालात ६ लाख ३५ हजार रुपये रोख रक्कम, सुमारे ३६ ग्रॅमचे सोन्याचे ब्रेसलेट (अंदाजे किंमत ५ लाख ४० हजार रुपये), ३ ग्रॅमची सोन्याची अंगठी (३० हजार रुपये) तसेच दोन मौल्यवान खडे (अंदाजे २५ हजार रुपये) असा एकूण १२ लाख ३० हजार रुपयांचा ऐवज समाविष्ट आहे.ही कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त शिवाजीराव बचाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. गाडगेनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी व डी.बी. पथक प्रमुख सागर ठाकरे यांच्यासह पथकातील कर्मचाऱ्यांनी समन्वयाने काम करत अल्पावधीत गुन्ह्याचा उलगडा केला.---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande