चाकूरमधील बालक खून प्रकरणाचा उलगडा; महिला आरोपी अटकेत
लातूर, 20 एप्रिल (हिं.स.)। चाकूर पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या अल्पवयीन मुलाच्या खून प्रकरणाचा लातूर पोलिसांनी अवघ्या काही तासांत उलगडा करत एका महिलेचा अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती. फिर्यादी मंगेश चंद्रकांत स्वामी यांनी त्
चाकूर


लातूर, 20 एप्रिल (हिं.स.)।

चाकूर पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या अल्पवयीन मुलाच्या खून प्रकरणाचा लातूर पोलिसांनी अवघ्या काही तासांत उलगडा करत एका महिलेचा अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती.

फिर्यादी मंगेश चंद्रकांत स्वामी यांनी त्यांचा सात वर्षीय मुलगा देवांश व त्याचा चुलत भाऊ साईचरण सकाळपासून बेपत्ता असल्याची तक्रार चाकूर पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी तात्काळ शोधमोहीम सुरू करत परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. त्यात सकाळी सुमारे 7.07 वाजता साईचरण हा देवांशला सायकलवर घेऊन जाताना दिसून आला.

दरम्यान, शोधमोहीमेदरम्यान उजळंब रोडवरील एका पडक्या घराजवळ ट्रॅक्टरच्या टायरच्या आड देवांशचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. तसेच श्वानपथक, न्यायवैद्यक पथक व बोटांचे ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक अमोल तांबे व अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व चाकूर पोलीस ठाण्याची पाच स्वतंत्र पथके तयार करण्यात आली. सीसीटीव्ही विश्लेषण, तांत्रिक तपास, संशयितांचा मागोवा व साक्षीदारांची चौकशी अशा सर्व अंगांनी तपास वेगाने करण्यात आला.

तपासादरम्यान फिर्यादींची वहिनी अनिता दिनेश स्वामी हिचे वर्तन संशयास्पद आढळले. तिचा मोबाईल बंद असणे, काही काळ घराबाहेर असणे आणि चौकशीत विसंगत माहिती देणे यामुळे पोलिसांनी तिची कसून चौकशी केली. त्यात तिने गुन्ह्याची कबुली दिली.

प्राथमिक तपासानुसार, पतीच्या अनैतिक संबंधांवरून सतत वाद होत असल्याने संबंधित महिलेला अडकवण्याच्या हेतूने आरोपीने स्वतःच्या व दिराच्या मुलांचे अपहरण झाल्याचा बनाव रचला. त्यानंतर दिराच्या मुलाचा खून करून मृतदेह पडक्या घराजवळ टाकण्यात आला.

या प्रकरणी चाकूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 103(1) व 238 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी अनिता दिनेश स्वामी हिला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात आणखी कोणी सहभागी आहे का, याचाही तपास सुरू आहे.

या कारवाईत उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र चौधर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर, चाकूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बालाजी भंडे व त्यांच्या पथकाने समन्वयाने कामगिरी बजावली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande