पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यापूर्वी राजस्थान रिफायनरीत आग, सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न
जयपूर , 20 एप्रिल (हिं.स.)।राजस्थानमधील बालोतरा जिल्ह्यातून सध्या मोठी बातमी समोर येत आहे. येथे पचपद्रा येथील रिफायनरीच्या सीडीयू (क्रूड डिस्टिलेशन युनिट) विभागात आज भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे. आग इतकी भीषण होती की काही क्षणांतच संपूर्ण
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यापूर्वी राजस्थान रिफायनरीत आग, सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न


जयपूर , 20 एप्रिल (हिं.स.)।राजस्थानमधील बालोतरा जिल्ह्यातून सध्या मोठी बातमी समोर येत आहे. येथे पचपद्रा येथील रिफायनरीच्या सीडीयू (क्रूड डिस्टिलेशन युनिट) विभागात आज भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे. आग इतकी भीषण होती की काही क्षणांतच संपूर्ण परिसरात गोंधळ आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले. या घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही.दरम्यान मंगळवारी, २१ एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी या रिफायनरीचे उद्घाटन करणार होते. मात्र उद्घाटनाच्या अवघ्या एक दिवस आधीच येथे आग लागल्याची घटना घडली आहे.

घटनेची माहिती मिळताच मोठ्या संख्येने अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना करण्यात आल्या. त्यानंतर अग्निशमन दलाच्या पथकांनी आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले. आग लागल्यानंतर सुरक्षा कर्मचारी आणि कामगारांना तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, आग लागल्यानंतर रिफायनरी परिसरातून निघणारा धुराचा प्रचंड लोट दूरवरूनही दिसत होता. सध्या आग लागण्याचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. मात्र प्रशासन आणि तांत्रिक पथके घटनास्थळी पोहोचून तपास करत आहेत.ही घटना अत्यंत गंभीर मानली जात आहे, कारण उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या रिफायनरीच्या लोकार्पणाचा कार्यक्रम प्रस्तावित आहे. तसेच आज सायंकाळी सुमारे ४ वाजता मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांचा देखील रिफायनरी दौरा नियोजित होता. त्यामुळे या दुर्घटनेमुळे सुरक्षा व्यवस्था आणि तयारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

सध्या मदत आणि बचावकार्य सुरू असून प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, अग्निशमन दलाच्या गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या असून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आपत्कालीन पथके तैनात करण्यात आली आहेत. तसेच अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, नुकसानीचा आढावा घेतला जात असून अधिक तपशीलांची प्रतीक्षा आहे. प्राथमिक अहवालानुसार, आग रिफायनरीच्या क्रूड डिस्टिलेशन युनिटमध्ये लागली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande