
नाशिक, 20 एप्रिल (हिं.स.) : टाटा कन्स्टंन्सी सर्व्हिसेसच्या (टीसीएस) नाशिक युनिटमधील लैंगिक छळ प्रकरणात पोलिस तपासादरम्यान अनेक महत्त्वाचे खुलासे समोर आले आहेत. एका महिला कर्मचाऱ्याने आपल्या सहकाऱ्यांवर “प्लेयर”, “झिरो फिगर” अशा अपमानास्पद टिप्पणी करण्याबरोबरच हिंदू देवी-देवतांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप केला आहे.
माहितीनुसार, संबंधित महिला टीसीएसच्या नाशिक कार्यालयात असोसिएट म्हणून कार्यरत होती. तिच्या लग्नानंतर सहकाऱ्यांकडून वारंवार टोमणे मारले जात असल्याचे तिने सांगितले. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, अशा प्रकारचे आरोप करणाऱ्या महिलांची संख्या 6 पेक्षा अधिक असून त्यांनी पुरुष सहकाऱ्यांवर लैंगिक छळ आणि जबरदस्ती धर्मांतराचेही आरोप केले आहेत. या प्रकरणात नाशिक पोलिसांच्या विशेष तपास पथकाने आतापर्यंत 9 एफआयआर दाखल केले असून 8 जणांना अटक करण्यात आली आहे. अटकेत एका महिला ऑपरेशन्स मॅनेजरचाही समावेश आहे.
दरम्यान, टीसीएसने या प्रकरणावर 17 एप्रिल रोजी प्रतिक्रिया देताना म्हंटले होते की, कंपनीची लैंगिक छळ किंवा कोणत्याही प्रकारच्या जबरदस्तीविरोधात “झिरो टॉलरन्स” धोरण आहे. नाशिक कार्यालयातील संबंधित कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आल्याचेही कंपनीने सांगितले. तसेच, प्राथमिक तपासात कंपनीच्या एथिक्स किंवा POSH (लैंगिक छळ प्रतिबंध) यंत्रणेकडे अशा प्रकारची कोणतीही अधिकृत तक्रार प्राप्त झालेली नसल्याचेही नमूद करण्यात आले आहे. दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून हे प्रकरण चिंताजनक असल्याचे म्हटले आहे.
तक्रारदार महिलेने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, प्रशिक्षण काळात काही सहकारी वारंवार तिच्याशी वैयक्तिक प्रश्न विचारत होते. तसेच एका सहकाऱ्याने तिच्याशी अयोग्य वर्तन केल्याचा आणि सार्वजनिक ठिकाणी तिच्या साडीचा पदर ओढल्याचा आरोपही तिने केला आहे.
तसेच, दुसऱ्या एका कर्मचाऱ्याने वारंवार तिच्या जवळ बसण्याचा प्रयत्न करून अयोग्य स्पर्श केल्याचा आणि सोशल मीडियावर संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्याचेही तिने सांगितले. विरोध केल्यानंतरही छळ सुरूच राहिल्याचा दावा तिने केला आहे. दरम्यान, या आरोपांवर संबंधित आरोपींच्या कुटुंबीयांनी हे प्रकरण कटकारस्थान असल्याचा दावा केला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून या प्रकरणातील सर्व बाबींची सखोल चौकशी केली जात आहे.
----------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी