
रायगड, 20 एप्रिल (हिं.स.)। मांडवा जेट्टी परिसरातील बेकायदेशीर स्टॉल, शॉपिंग मॉल आणि रेस्टॉरंट बांधकामांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते संजय सावंत यांनी जिल्हाधिकारी रायगड आणि महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र देत तात्काळ कारवाईची मागणी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या बांधकामांमध्ये पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ तसेच किनारपट्टी नियमन (CRZ) नियमांचे उल्लंघन झाल्याचा आरोप आहे. महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण (MCZMA) यांनी २८ जुलै २०१७ रोजीच संबंधित बेकायदेशीर स्टॉल हटवण्याचे आदेश दिले होते. मात्र, तब्बल आठ वर्षांनंतरही या आदेशांची अंमलबजावणी झालेली नाही.
या प्रकरणामुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे. तसेच या ठिकाणी सुरू असलेल्या दारू विक्रीबाबतही गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. CRZ क्षेत्रात अशा प्रकारच्या परवानग्या कशा देण्यात आल्या, याची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
संजय सावंत यांनी दिलेल्या निवेदनात मांडवा जेट्टी परिसराची तात्काळ पाहणी करून MCZMA च्या आदेशांची अंमलबजावणी करावी, सर्व बेकायदेशीर बांधकामे हटवावीत आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या गंभीर प्रकरणात प्रशासन काय भूमिका घेते, याकडे संपूर्ण रायगड जिल्ह्याचे लक्ष लागले आहे
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)