
बंगळूरु, 20 एप्रिल (हिं.स.)खराब हवामानामुळे हैदराबादहून हुबळीला जाणाऱ्या फ्लाय९१ (Fly91) विमानाला बंगळूरला वळवावे लागले. विमान सुमारे साडेतीन तास हवेतच राहिले, ज्यामुळे प्रवाशांमध्ये घबराट पसरली.
रविवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास हे विमान हैदराबादहून निघाले होते आणि ९० मिनिटांत हुबळीला पोहोचणार होते. पण खराब हवामानामुळे विमानाला उतरण्याची परवानगी नाकारण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, हवामान सुधारण्याची वाट पाहत विमान सुमारे एक तास हुबळीच्या आकाशात घिरट्या घालत होते.या काळात, विमान सुमारे साडेतीन तास हवेतच राहिले, ज्यामुळे काही प्रवाशांमध्ये घबराट पसरली. काही घाबरलेले प्रवासी रडू लागले आणि आपल्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करू लागले. हवामानात सुधारणा न झाल्याने, विमान बंगळूरला वळवण्यात आले. सायंकाळी ६:३० वाजण्याच्या सुमारास विमान सुरक्षितपणे उतरले. हवामान सामान्य झाल्यावर, रात्री ११ वाजण्याच्या सुमारास विमान हुबळीसाठी रवाना झाले.फ्लाय९१ एअरलाइन्सने तांत्रिक बिघाडाचे वृत्त पूर्णपणे फेटाळून लावले आहे. कंपनीने सांगितले की, विमानाला त्याच्या गंतव्यस्थानाजवळ खराब हवामानाचा सामना करावा लागला, ज्यामुळे प्रमाणित सुरक्षा नियमांनुसार ते बंगळूरुला वळवण्यात आले.
एअरलाइनच्या म्हणण्यानुसार, त्यानंतर विमान हुबळीला परतले आणि नंतर हैदराबादसाठी सुरक्षितपणे रवाना झाले. कंपनीने स्पष्ट केले की, संपूर्ण प्रक्रिया प्रमाणित कार्यपद्धतीनुसार पार पाडण्यात आली आणि सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड करण्यात आली नाही. FLY91 ने हे देखील स्पष्ट केले की, काही माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेले विमानातील तांत्रिक बिघाडाचे आरोप पूर्णपणे खोटे आणि निराधार आहेत. एअरलाइनने सांगितले की, त्यांच्याकडे प्रशिक्षित वैमानिक, केबिन क्रू आणि ग्राउंड स्टाफ यांची एक मजबूत टीम आहे, जी कोणतीही परिस्थिती हाताळण्यास सक्षम आहे आणि कंपनीचा सुरक्षा रेकॉर्ड पूर्णपणे सुरक्षित आणि निर्दोष आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे