
दिंडोरी, 21 एप्रिल (हिं.स.) : नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील वलखेड येथे मंगळवारी सायंकाळी अत्यंत धक्कादायक घटना घडली. मळ्यात काम करणाऱ्या कामगारांच्या दोन वर्षीय मुलीला बिबट्याने हल्ला करून उचलून नेल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वलखेड येथील नारायण जयवंत शिंदे यांच्या मळ्यात काम करणाऱ्या कामगारांची मुलगी ज्ञानेश्वरी मोरे (वय 2 वर्षे) ही खेळत असताना बिबट्याने अचानक हल्ला केला. हल्ल्यानंतर बिबट्याने तिला उचलून जंगलाच्या दिशेने नेल्याचे सांगितले जात आहे.
घटनेनंतर तात्काळ ग्रामस्थांनी शोधमोहीम सुरू केली असून वनविभाग, पोलीस प्रशासन आणि स्थानिक नागरिक घटनास्थळी दाखल झाले आहेत. सध्या मोठ्या प्रमाणावर शोधकार्य सुरू असून अद्याप मुलीचा शोध लागलेला नाही.
दरम्यान, नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी, नाशिक, सिन्नर आणि इगतपुरी या तालुक्यांमध्ये बिबट्यांचा वावर सातत्याने वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. बिबट्यांच्या हल्ल्यांमध्ये जखमी तसेच मृत्यू झाल्याच्या घटनांमध्येही वाढ झाल्याने स्थानिक नागरिकांकडून वनविभागाकडे ठोस उपाययोजनांची मागणी होत आहे.
या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून शोधमोहीम युद्धपातळीवर सुरू आहे.
----------------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV