
लातूर, 21 एप्रिल (हिं.स.)। शासनाच्या विविध आरोग्य योजनांमधून मदत न मिळालेल्या पात्र व गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी प्रभावी ‘आधार’ ठरत आहे. लातूर जिल्ह्यात चालू आर्थिक वर्षात ९८९ रुग्णांना सुमारे ७ कोटी ७२ लाख रुपयांची वैद्यकीय आर्थिक मदत वितरित करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून जिल्हा कक्षाची स्थापना, कागदविरहित अर्ज प्रक्रिया, तातडीने अर्ज निकाली काढण्याची पद्धत अशा अनेक सकारात्मक बदलांची अंमलबजावणी करण्यात आली आहे. तसेच सामंजस्य करार, सामूहिक निधी उभारणी आदी माध्यमांतून समाजातील दाते, धर्मादाय रुग्णालये व संस्थांचे सहकार्यही मिळत आहे.सहाय्यता निधीच्या कार्यपद्धतीत झालेल्या सुधारणा आणि मदतीचे विविध मार्ग उपलब्ध झाल्याने पारदर्शकता वाढली असून मदत वितरणाचा वेगही लक्षणीयरीत्या वाढला आहे. त्यामुळे अधिकाधिक पात्र रुग्णांना वेळेत आर्थिक सहाय्य मिळत आहे.
२० गंभीर आजारांसाठी मदत
कॉक्लियर इम्प्लांट (वय २ ते ६ वर्षे), हृदय, यकृत, मूत्रपिंड, फुफ्फुस, बोन मॅरो, हात व गुडघ्याचे प्रत्यारोपण, कूल्हा प्रत्यारोपण, कर्करोग शस्त्रक्रिया, रस्ते अपघात, लहान बालकांच्या शस्त्रक्रिया, मेंदूचे आजार, हृदयरोग, डायालिसिस, कर्करोग उपचार (केमोथेरपी/किरणोत्सर्ग), अस्थिबंधन, नवजात शिशूंचे आजार, भाजलेले रुग्ण, विद्युत अपघातग्रस्त अशा एकूण २० गंभीर आजारांसाठी अर्थसहाय्य दिले जाते.
सामंजस्य करारातून मदतीचा विस्तार
मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्या पुढाकाराने मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष, BPCL Foundation व Tata Memorial Centre यांच्यात बालकांच्या कर्करोग उपचारासाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे. या करारामुळे सामाजिक दायित्व निधीतून उपचारांसाठी विशेष आर्थिक सहाय्य उपलब्ध होणार असून गरजू बालकांना दर्जेदार उपचार सुलभ होणार आहेत.
आर्थिक वर्षातील मदत आकडेवारी
१ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत राज्यातील ४० हजार ७७६ रुग्णांना एकूण ३३३ कोटी ६ लाख ८१ हजार ५०० रुपयांची वैद्यकीय मदत देण्यात आली. त्यापैकी लातूर जिल्ह्यातील ९८९ रुग्णांना सुमारे ७ कोटी ७२ लाख ९५ हजार रुपयांची मदत वितरित करण्यात आली आल्याचे सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis