युवाशक्ती जागर यात्रा अराजकता वाढवणाऱ्या शक्तींना रोखण्याचे काम करेल - मुख्यमंत्री
मुंबई, 21 एप्रिल (हिं.स.)। राज्यातील 65 टक्के लोकसंख्या असलेली 35 वर्षांच्या आतील युवाशक्ती संघटित करून आपण ती एका दिशेने नेऊ शकलो तर युवाशक्ती जागर यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्रात एक मोठे परिवर्तन होऊ शकेल. राज्यात मोठ्या प्रमाणात अराजकता वाढवण
युवाशक्ती जागर यात्रा अराजकता वाढवणाऱ्या शक्तींना रोखण्याचे काम करेल* मुख्यमंत्री


मुंबई, 21 एप्रिल (हिं.स.)। राज्यातील 65 टक्के लोकसंख्या असलेली 35 वर्षांच्या आतील युवाशक्ती संघटित करून आपण ती एका दिशेने नेऊ शकलो तर युवाशक्ती जागर यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्रात एक मोठे परिवर्तन होऊ शकेल. राज्यात मोठ्या प्रमाणात अराजकता वाढवणाऱ्या अर्बन नक्षलवादासारख्या शक्ती युवकांमध्ये विष पेरण्याचे काम करत आहेत आहेत. या युवकांचे मत संविधानाविरुद्ध कलुषित करण्याचे कारस्थान चाललेले आहे. या युवकांना संविधानाने तयार केलेल्या व्यवस्थेप्रती जागृत करण्याचे काम भारतीय जनता युवा मोर्चातर्फे आयोजित करण्यात आलेली ही यात्रा पार पाडेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी व्यक्त केला. भारतीय जनता युवा मोर्चाच्या युवाशक्ती जागर यात्रेचा प्रारंभ करताना फडणवीस बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी युवा शक्ती जागर यात्रेत काढण्यात आलेल्या कार रॅलीला हिरवा झेंडा दाखवला.

या युवाशक्ती जागर यात्रेद्वारे महाराष्ट्र पिंजून काढण्याचा उत्तम निर्णय भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी घेतला आहे. महाराष्ट्रातील सामाजिक आणि आर्थिक प्रश्नांवर काम केलेल्या संस्था तसेच शेतकरी, कामगार, युवा अशा सर्व घटकांपर्यंत ही यात्रा पोहचेल. या घटकांतील युवा शक्तीला राष्ट्रीय विचाराने प्रेरित करण्याचे काम करेल. राज्याच्या कानाकोपऱ्यात गेल्याने युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये अधिक प्रगल्भता येईल आणि निश्चितपणे त्याचा उपयोग पुढे युवा मोर्चाचे स्वरूप अधिक व्यापक होण्यासाठी होईल, असे फडणवीस म्हणाले.

ज्याप्रकारे संसदेत विरोधकांकडून महिला आरक्षणाची भ्रूणहत्या करण्यात आली त्याबाबतही महिलावर्गात जागर करण्याची गरज असल्याची सूचना मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली. या विधेयकाला विरोध करून लोकशाहीचा अपमान करण्याचे काम विरोधकांनी केले आहे. डिलिमिटेशन, जनगणना याबाबत विरोधक खोटे बोलतात. महिलांना आरक्षण द्यायचेच नाही, याकरिता विरोधकांनी प्रयत्न केले. त्यांच्या या मानसिकतेविरुद्ध आमचा लढा सुरु झाला असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, या युवाशक्ती जागर यात्रेत राज्यातील संपूर्ण नारी शक्तीला जागृत करून बुरसटलेल्या प्रवृत्तींविरुद्ध एकत्र करावे लागेल आणि त्यामुळे विरोधकांना या विधेयकाला पाठींबा द्यावाच लागेल.

यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अपेक्षित असलेली युवाशक्ती महाराष्ट्रात एकत्र व्हावी यासाठी ही यात्रा काढण्यात आली आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्रातील आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील राज्य सरकार ज्या ताकदीने देश आणि राज्य हे अग्रेसर होण्यासाठी दिवसरात्र प्रयत्न करताहेत हे गावखेड्यापर्यंत शेतकरी, कष्टकरीपासून आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक तरुणाला सांगण्यासाठी ही यात्रा सुरु होत आहे.

येत्या काळात भाजपाचा युवा मोर्चा पहिल्या क्रमांकाचा झाला पाहिजे, याच दिशेने आपले प्रयत्न सुरु असल्याचे सांगून युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष कृष्णराज महाडिक म्हणाले, युवा मोर्चा समाजातील सर्व थरातील युवकांपर्यंत पोहोचावा यासाठी केवळ राज्यातीलच नव्हे तर केंद्रातील मंत्रीमहोदय, पदाधिकारी आणि विद्यार्थी चळवळीतील मंडळींचे मार्गदर्शन घेत आहे. युवा मोर्चाचे पदाधिकारी आणि नेत्यांनी अतिशय परिश्रम घेऊन या युवाशक्ती जागर यात्रेची आखणी केली असल्याने संपूर्ण राज्यातील युवावर्ग या यात्रेशी जोडला जाणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande