रेल्वेचे काम युद्धपातळीवर पूर्ण करून १५ ऑगस्टपर्यंत पुणे-परळी रेल्वे सुरू झाली पाहिजे
बीड, 23 एप्रिल (हिं.स.)। जिल्हाधिकारी कार्यालय, बीड येथे आयोजित रेल्वे व राष्ट्रीय महामार्ग आढावा बैठकीत खासदार खा. बजरंग सोनवणे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले की, अहमदनगर-बीड-परळी रेल्वेचे काम युद्धपातळीवर पूर्ण करून १५ ऑगस्टपर्यं
Q


बीड, 23 एप्रिल (हिं.स.)।

जिल्हाधिकारी कार्यालय, बीड येथे आयोजित रेल्वे व राष्ट्रीय महामार्ग आढावा बैठकीत खासदार खा. बजरंग सोनवणे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले की, अहमदनगर-बीड-परळी रेल्वेचे काम युद्धपातळीवर पूर्ण करून १५ ऑगस्टपर्यंत पुणे-परळी रेल्वे सुरू झाली पाहिजे.

बैठकीला जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, रेल्वे विभागाचे वरिष्ठ अधिकारी, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी तसेच संबंधित प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

खा. बजरंग सोनवणे यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले की, बीड जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग व ग्रामीण रस्त्यांवरील अपघातप्रवण ब्लॅकस्पॉट तातडीने कमी करावेत, खराब रस्त्यांची दुरुस्ती करावी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे.

बैठकीत अंबाजोगाई, केज, नेकनूर, मांजरसुंबा, पाटोदा व माजलगाव शहरांभोवती बायपास व उड्डाणपूल उभारण्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. अंबाजोगाई येथील यशवंतराव चव्हाण चौकात फूटओव्हर ब्रिज उभारणे, पिंपळा धायगुडा-लोखंडी सावरगाव-केज-मांजरसुंबा- पाटोदा-चुंबळी फाटा हा रस्ता दुहेरी करणे, तसेच विविध अपघातप्रवण ठिकाणांची तातडीने दुरुस्ती करण्याचे निर्देश देण्यात आले.

तसेच माजलगाव-धारूर-केज रस्त्याची तातडीने दुरुस्ती, खरवंडी-मादळमोही-पाडळसिंगी-गढी-माजलगाव मार्गावरील खराब रस्त्यांबाबत कारवाई, तसेच पैठण-पंढरपूर पालखी मार्गावरील डोंगरकिन्ही ते पारगाव दरम्यानच्या अत्यंत खराब रस्त्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.

रेल्वे विभागाच्या आढाव्यात ३१ मेपर्यंत परळीपर्यंत रेल्वे ट्रॅक पूर्ण करणे व जून महिन्यात रेल्वेची चाचणी घेण्याचे नियोजन समोर आले. यावेळी खा. बजरंग सोनवणे यांनी बीड-नगर-मुंबई व बीड-नगर-पुणे इंटरसिटी सेवा सुरू करण्याची मागणी केली. तसेच आष्टी, पाटोदा, शिरूर व बीड तालुक्यातील गावांमध्ये रोड ओव्हर ब्रिज उभारणे, बार्शी नाका येथे अतिरिक्त रेल्वे थांबा, सर्व स्थानकांवर पार्किंग व सोलर प्रकल्प उभारण्याबाबतही सूचना दिल्या.

तसेच बैठकीत धाराशिव-बीड-छत्रपती संभाजीनगर या नवीन रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणाचा आढावाही घेण्यात आला. या प्रकल्पाची व्यवहार्यता तपासून प्रलंबित भूसंपादन प्रकरणे तातडीने निकाली काढावीत व केंद्र शासनाकडे आवश्यक प्रस्ताव त्वरीत पाठवावेत, अशा सूचना खा. बजरंग सोनवणे यांनी रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

घाटनांदूर रेल्वे स्टेशनवर विविध रेल्वेंना थांबा मिळावा यासाठी केंद्र शासनाकडे तातडीने प्रस्ताव सादर करावा, असे निर्देशही खा. बजरंग सोनवणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande