
बीड, 23 एप्रिल (हिं.स.)।
बीड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांचा पीक विमा नाकारला गेल्याने किसान सभेने आक्रमक पवित्रा घेत सरकारला तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. सप्टेंबर २०२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे आणि जमिनीचे अतोनात नुकसान झाले असतानाही, सुधारित पीक विमा योजनेतील क्लिष्ट निकषांमुळे शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडली आहे.
किसान सभेचे राज्य उपाध्यक्ष ॲड. अजय बुरांडे यांनी आरोप केला की, सरकारने विमा कंपन्यांचे हित जपण्यासाठी नियमावलीत बदल केले असून यामुळे बळीराजाची मोठी लूट होत आहे. पूर्वी ९० टक्क्यांपर्यंत असलेली जोखीम आता ७० टक्क्यांवर आणली असून आयसीआयसीआय लोम्बार्ड सारख्या कंपन्या पीक कापणी अहवाल फेटाळून शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडत आहेत. सरकारने आश्वासन दिलेली प्रति हेक्टरी १७,५०० रुपयांची विमा भरपाई तात्काळ न दिल्यास आणि विम्याचे जाचक निकष पूर्ववत न केल्यास शेतकरी पुन्हा रस्त्यावर उतरून केंद्र व राज्य सरकारविरोधात मोठा संघर्ष छेडतील असा इशारा यावेळी देण्यात आला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis