छ. संभाजीनगर - १ मेपासून जनगणनेच्या पहिल्या टप्प्यास प्रारंभ
छत्रपती संभाजीनगर, 25 एप्रिल (हिं.स.)। आगामी राष्ट्रीय जनगणनेच्या पहिल्या टप्प्यास १ मे २०२६ पासून प्रारंभ होत असून, या टप्प्यात जिल्ह्यातील प्रत्येक घराची तसेच कुटुंबातील मूलभूत सुविधांची माहिती संकलित केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी
छ. संभाजीनगर - १ मेपासून जनगणनेच्या पहिल्या टप्प्यास प्रारंभ


छत्रपती संभाजीनगर, 25 एप्रिल (हिं.स.)। आगामी राष्ट्रीय जनगणनेच्या पहिल्या टप्प्यास १ मे २०२६ पासून प्रारंभ होत असून, या टप्प्यात जिल्ह्यातील प्रत्येक घराची तसेच कुटुंबातील मूलभूत सुविधांची माहिती संकलित केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी नागरिकांनी शासनाच्या अधिकृत पोर्टलवर ऑनलाइन स्वयं-गणना करून या प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले आहे.

जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सांगितले की, जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात नागरिकांना स्वतःहून ऑनलाइन पद्धतीने माहिती भरण्यासाठी १५ दिवसांचा कालावधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. नागरिकांनी www.se.census.gov.in या अधिकृत पोर्टलवर जाऊन आपल्या कुटुंबाची व घराची माहिती अचूकरीत्या नोंदवावी. ऑनलाइन माहिती भरल्यानंतर संबंधित कुटुंबास एक ‘युनिक आयडी’ प्राप्त होणार असून, जनगणनेसाठी नियुक्त प्रगणक घरभेटीवर आल्यास हा क्रमांक त्यांना सादर करणे आवश्यक राहणार आहे.

जनगणना प्रक्रिया सुरळीत, अचूक आणि वेळेत पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने व्यापक यंत्रणा उभी केली आहे. जिल्ह्यात एकूण १ हजार ९७८ प्रगणक, ३४३ पर्यवेक्षक तसेच फिल्ड ट्रेनर्स यांची नियुक्ती करण्यात आली असून, संपूर्ण कामकाजासाठी २ हजार २६ गटांची निर्मिती करण्यात आली आहे. या सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देऊन माहिती संकलनाची पूर्वतयारी पूर्ण करण्यात आली आहे.

या जनगणनेत नागरिकांना एकूण ३४ प्रश्नांची माहिती द्यावी लागणार आहे. यामध्ये घरातील टीव्ही, मोबाइल, संगणक, वाहन यांसारख्या सुविधा, शौचालयाची उपलब्धता, प्रकाश व्यवस्था, पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत, सांडपाणी व्यवस्थापन, स्वयंपाकासाठी वापरले जाणारे इंधन, घराची मालकी, कुटुंबातील सदस्यांची संख्या, जातीचा प्रवर्ग, विवाहित जोडपी आदी महत्त्वाच्या बाबींचा समावेश आहे. शासनाच्या विविध योजनांचे नियोजन, संसाधनांचे वाटप आणि विकास आराखडे तयार करण्यासाठी ही माहिती अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

भाड्याच्या घरात वास्तव्यास असलेल्या नागरिकांनी विशेषतः आपण ज्या ठिकाणी सध्या राहात आहोत, त्या ठिकाणचीच माहिती पोर्टलवर भरावी किंवा प्रगणकांना द्यावी, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. यामुळे लोकसंख्येचे वास्तव चित्र समोर येण्यास मदत होणार आहे.

जनगणनेचा दुसरा टप्पा फेब्रुवारी २०२७ पासून सुरू होणार असून, त्यामध्ये प्रत्यक्ष लोकसंख्याविषयक सविस्तर माहिती गोळा केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यातील माहिती संकलन हे त्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.

राष्ट्रीय स्तरावरील ही महत्त्वपूर्ण प्रक्रिया यशस्वी करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी अचूक माहिती देऊन प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande